सुंदर ते ध्यान उभे विटेवरी... पंढरीत वारकऱ्यांचा मेळा

सोलापूर
Updated Jul 12, 2019 | 08:31 IST

आषाढी एकादशीच्या निमित्तानं आज पंढरपूर नगरी सजली आहे. सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीनं निघालेल्या लाखो वैष्णवांचा सोहळा आज पंढरपुरात दाखल झाला. आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरीत आज १५ लाख भाविक झाले आहेत.

Devendra Fadanvis
राज्यात चांगला पाऊस होऊ दे,विठ्ठलाकडे मुख्यमंत्र्यांचं साकडं  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • आषाढी एकादशीच्या निमित्तानं आज पंढरपूर नगरी सजली
  • एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरीत आज जवळपास १५ लाख भाविक दाखल
  • मुख्यमंत्री यांची सपत्नीक शासकीय महापूजा

पंढरपूर: आषाढी एकादशीच्या निमित्तानं आज पंढरपूर नगरी सजली आहे. सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीनं निघालेल्या लाखो वैष्णवांचा सोहळा आज पंढरपुरात दाखल झाला आहे. आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरीत आज जवळपास १५ लाख भाविक दाखल झाले आहेत.  आज पहाटे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रूख्मिणीची शासकीय महापूजा केली. यंदा मुख्यमंत्र्यांसोबत लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातल्या सांगवी सुनेवाडी तांडा या गावातील वारकरी विठ्ठल चव्हाण आणि प्रयाग चव्हाण या दाम्पत्याला पूजेचा मान मिळाला. गेली ३९ वर्षे हे दाम्पत्य वारी करत आहेत. जवळपास १९८० पासून हे दाम्पत्य वारी करतायेत. मुख्यमंत्र्यांनी या दाम्पत्याचा सत्कार केला. तसंच मंदिर समिती अध्यक्ष अतुल भोसले यांच्या हस्ते हा सत्कार समारंभ पार पडला. 

पहाटे सुमारे दीड तास मंत्रोच्चरांच्या साक्षीनं हा पूजा विधी सोहळा पार पडला. रात्री सव्वादोन वाजता विठ्ठलाच्या पूजेला सुरूवात झाली आणि तीन वाजता सांगता झाली.  त्यानंतर तीन ते साडेतीन तास रूक्मिणी मातेची पूजा झाली. दुग्धाभिषेक आणि विविध लेप लावून पांडुरंगाच्या मुर्तीला स्नान घालण्यात आलं. त्यानंतर दोन्ही मूर्तींना सुंदर वस्त्र परिधान करण्यात आली. तुळशीहार आणि फुलांच्या माळांनी विठुरायाला सजवण्यात आलं.अलंकृत दागिनं आणि वस्त्र घालून विठ्ठल रूक्मिणीची पूजा संपन्न झाली. 

विठ्ठल रूक्मिणीचं पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरच्या पुढे गेली आहे. गुरूवारी दशमीदिवशी पंढरी वारकऱ्यांनी फुलून गेली आहे. सगळीकडे हरीनामाचा गजर सुरू आहे. गुरूवारी संध्याकाळी संतांच्या पालख्या वाखरीतून येथे दाखल झाल्या.  त्यानंतर शहरात आणखी गर्दी झाली. आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरातील मठ, हॉटेल, भक्तनिवास, धर्मशाळा, हॉल आणि मंदिर परिसरातील घरं हाऊसफुल झाली आहेत. जे ठिकाण मिळेल तिथे सर्वत्र वारकऱ्यांच्या राहुट्या आणि तंबू दिसत आहेत. 

यावेळी मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाकडे दुष्काळमुक्तीसाठी साकडं घातलं. राज्य सरकारच्या दुष्काळमुक्तीच्या प्रयत्नांना निसर्गाची साथ लाभू दे, बळीराजाला तुझा आशीर्वाद मिळू दे आणि माझ्या महाराष्ट्राला सुजलाम, सुफलाम आणि संपन्न होऊ दे असं साकडं मुख्यमंत्र्यांनी आज पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी घातलं. आजच्या महापूजेनंतर मंदीर समिती आणि मराठा समाजाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. राजाच्या जनतेच्या मनातल्या आशा आकांशा पूर्ण कर, असं साकडं आपल विठुरायाला घातल्याचं मुख्यमंत्र्यांनी सत्कारा दरम्यान व्यक्त केलं.

 

दरम्यान मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनामुळे मुख्यमंत्र्यांना गेल्या आषाढी एकादशील पंढरपूरला येता आलं नव्हतं. याची आठवणी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी करून दिली. तेव्हा तसा विठ्ठलानेच आदेश दिला होता. विठुरायाचा तो आदेश मानून वर्षा बंगल्यावर पूजा केली. आज त्याच्याच आशीर्वादानं पंढरपुरात आलो. त्याच्या आशीर्वादानं चांगलं काम करू शकलो. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो, असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.  

मराठा समाजानं केलेल्या सत्काराबद्दलही मुख्यमंत्र्यांनी आभार मानले.  या सत्काराची गरज नव्हती. राज्यकर्ता म्हणून मी माझं कर्तव्य केलं असून जनतेच्या भावनेचा आदर राखून मराठा समाजाला आरक्षण दिलं. आरक्षण देताना इतर समाजावर अन्याय होऊ दिला नसल्याचं देखील मुख्यमंत्री म्हणाले. एवढंच काय तर विठ्ठलरूपी जनतेची पाच वर्षे पूजा करण्याची संधी मिळणं हे माझं भाग्य आहे. ती संधी पुन्हा मिळेल, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. 

चंद्रभागा नदीच्या पैलतीरावर ६५ एकर जागेत वारकऱ्यांसाठी तळ करण्यात आला आहे. येथे पालिकेच्यावतीनं वीज, पाणी, शौचालय, वैद्यकीय सेवा, पोलीस बंदोबस्त इत्यादी सुविधा दिल्या आहेत. यावर्षीचं योग्य नियोजनात महिलांसाठी २१ ठिकाणी चेंजिंग रूमची सोय उपलब्ध करून दिली आहे. यासोबतच दर्शन रांगेत रबरी कार्पेट, मोफत अन्नदान, २४ तास वैद्यकीय सुविधा, चहा, स्वच्छ पाणी इत्यादी सुविधांचा समावेश असल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दिली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी... पंढरीत वारकऱ्यांचा मेळा Description: आषाढी एकादशीच्या निमित्तानं आज पंढरपूर नगरी सजली आहे. सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीनं निघालेल्या लाखो वैष्णवांचा सोहळा आज पंढरपुरात दाखल झाला. आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरीत आज १५ लाख भाविक झाले आहेत.
Loading...
Loading...
Loading...