पंढरपूर: राज्यात एकीकडे सत्तेचा पेच कायम आहे तर दुसरीकडे अवकाळी पावसामुळे राज्यातील बळीराजा हतबल झाला आहे. याच सगळ्या पार्श्वभूमीवर आज (शुक्रवार) राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट विठ्ठलाच्या चरणीच साकडं घातलं आहे. 'राज्यातील शेतकरी आणि सामान्य जनता सुखी होऊ दे.' असे साकडंच चंद्रकांत पाटील यांनी विठ्ठलाच्या चरणी घातलं.
चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी यांची शासकीय महापूजा करण्यात आली. दरम्यान, यावेळी सुनील महादेव ओमासे आणि नंदा ओमासे या वारकरी दाम्पत्याला देखील महापुजेचा मान मिळाला. महापुजेनंतर संत तुकाराम भवन येथे पार पडलेल्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या वारकरी दाम्पत्याचा सत्कारही करण्यात आला.
मानाचा वारकरी ठरलेले सुनील ओमासे सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेडग येथील आहेत. शेतकरी कुटुंबातील ओमासे २००३ पासून वारी करतात. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांना चांदीची विठ्ठल रुक्मिणी मूर्ती, शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यासोबतच त्यांना मोफत एसटी पासही देण्यात आला आहे.
दरम्यान, या कार्यक्रमावेळी चंद्रकांत पाटील असं म्हणाले की, 'यावर्षी राज्यासमोर अनेक आव्हाने आली. सुरुवातील दुष्काळस्थिती होती. त्यानंतर महापुराला सामोरे जावे लागले आणि आता अवकाळी पावसामुळे शेतीचे आतोनात नुकसान झाले आहे. या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी राज्यशासनाने उपाययोजना केल्या आहेत. केंद्र सरकारकडेही मदत मागितली आहे.' असं चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.
राज्यात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. अशावेळी भाजप नेमका काय निर्णय घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून चौदा दिवस उलटले आहेत. मात्र अद्यापही राज्यात नवं सरकार स्थापन झालेली नाही. त्यातच आता देवेंद्र फडणवीस आज (८ नोव्हेंबर) आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ८ नोव्हेंबर रोजी १३व्या विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे तांत्रिक बाब म्हणून देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा द्यावा लागेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सगळ्या राजकीय गदारोळात आज कार्तिकी एकादशीनिमित्त चंद्रकांत पाटील यांनी स्वत: पंढरपुरात येऊन विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली. त्यामुळे राज्यावरील राजकीय संकट दूर होऊ दे अशीही प्रार्थना त्यांनी विठ्ठला चरणी नक्कीच केली असणार.