सोलापूर : चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीला उकळत्या तेलात हात घालण्यास सांगितल्याचा अघोरी प्रकार उस्मानाबाद जिल्ह्यात (osmanabad district) घडला. या प्रकरणात पती विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अघोरी अशा या प्रकरणाला एक नवे वळण लागले आहे. उकळत्या तेलात हात घालणाऱ्या महिलेने दोन जण तिच्यावर बलात्कार करत असल्याचा आरोप केला. बलात्कार प्रकरणी भगवान धनवे आणि पोलीस कर्मचारी खुने या दोन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. (case of rape registered against two after woman from pardhi community in osmanabad district lodged a complaint)
तुझ्या पतीला अडचणीत आणेन, जेलमध्ये टाकेन अशा स्वरुपाच्या धमक्या देत पोलीस कर्मचारी खुने याने पद आणि अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप महिलेने केला आहे. पोलीस कर्मचारी खुने याने महिलेला धमकावले आणि तिच्यावर बलात्कार केला. या गुन्ह्यात त्याला भगवान धनवे याने साथ दिली, अशा स्वरुपाचा आरोप महिलेने केला आहे. या घटनेनंतर पतीने चारित्र्यावर संशय घेऊन उकळत्या तेलात हात घालण्यास सांगितल्याचे महिलेने सांगितले.
उकळत्या तेलाच्या या धक्कादायक प्रकरणात सोलापूर ग्रामीण पोलिसांनी भगवान धनवे आणि पोलीस कर्मचारी खुने या दोन जणांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पती विरोधात पत्नीला उकळत्या तेलात हात घालण्यास सांगून अघोरी प्रथेचा अवलंब केल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पीडित महिला आणि तिचा पती ज्या समाजाचे आहेत त्या समाज्याच्या जात पंचायतीवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
पतीच्या आग्रहानंतर उकळत्या तेलात हात घातल्यामुळे महिलेचा हात भाजला आहे. भाजलेल्या हातावर उपचार सुरू आहेत. उकळत्या तेलात हात घालण्याच्या कृतीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओची मूळ प्रत मिळवून पोलिसांनी तपास सुरू करण्याचा आणि सखोल चौकशी करुन कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
परंडा तालुक्यातील एका गावात पारधी समाजातील दांपत्य राहते. या दांपत्याच्या जीवनात वादळ आले. पतीने पत्नीला उकळत्या तेलात हात घालण्यास सांगितले. आता या प्रकरणात बरीच नवी माहिती उजेडात येत आहे.
पीडित महिलेने तिच्या पतीला जेलमध्ये टाकण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला असल्याचा आरोप त्या महिलेने केला आहे. पारधी समाज जात पंचायतीच्या या अमानुष न्यायनिवाड्याचा प्रकार उस्मानाबाद जिल्ह्यातील (osmanabad district) परंडा तालुक्यात (paranda taluka) घडला असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
ते उकळल्यावर नवरा म्हणवणाऱ्या व्यक्तीने त्या कढईत ५ रुपयांचं नाणं टाकलं आणि उकळत्या तेलात हात घालून ते नाणं काढण्यास संबंधित महिलेला सांगण्यात आलं. उकळत्या तेलातील नाणं बाहेर काढताना महिलेचा हात भाजला नाही तर तिचं चारित्र्य शुद्ध! जर तिचा हात भाजला तर तिला चारित्र्यहीन असल्याचं जाहीर केलं जातं! दरम्यान उकळत्या तेलातून नाणे काढण्यासाठी महिलेने हात देखील घातला मात्र, महिलेचा हात चांगलाच भाजला आहे. तेलात हात घालण्याअगोदर सदर महिला गयावया करत तेलात हात घालण्यास नकार देत होती. पण आपल्या पत्नीचं चारित्र्य तपासण्यासाठी तिच्या पतीनं तेलात हात घालण्यासाठी बळजबरी केली. या परीक्षेत पास-नापास कसं ठरतं हा प्रश्न आपल्याला पडला असेल.