पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरू दे, जनतेला निरोगी आयुष्य जगू दे; मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाला साकडे

सोलापूर
भरत जाधव
Updated Jul 20, 2021 | 08:10 IST

आज पहाटे आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा झाली.

Chief Minister Uddhav Thackeray performed the official Maha Puja
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • काल भरपावसात स्वत: गाडी चालवत मुख्यमंत्र्यांनी गाठली पंढरी
  • यावर्षी वारकरी प्रतिनिधी म्हणून वर्धा येथील विठ्ठल भक्त केशव कोलते आणि इंदुमती कोलते या दाम्पत्याला शासकीय महापूजेचा मान मिळाला
  • केशव कोलते विठ्ठल मंदिरात 20 वर्षांपासून वीणा वाजवतात.

सोलापूर :  आज पहाटे आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा झाली. दरवर्षी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थिती होणार हा सोहळा यावर्षी कोरोना संकटामुळे मोजक्या लोकांच्या उपस्थिती पार पडला. पालकमंत्री दत्तात्रय भरणे, त्यांच्या पत्नी सारिका भरणेही यावेळी उपस्थित होते. यावर्षी वारकरी प्रतिनिधी म्हणून वर्धा येथील विठ्ठल भक्त केशव कोलते आणि इंदुमती कोलते या दाम्पत्याला शासकीय महापूजेचा मिळाला होता. महापुजेच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलालाच्या चरणी साकडे घातले आहे. 

पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे. भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे. यासाठी देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे. माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आषाढी एकादशीच्या महापुजेच्यावेळी पांडुरंगाच्या चरणी घातले. विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय पूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या सुविद्य पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते पार पडली. त्यानंतर पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अन्य वरिष्ठ  अधिकाऱ्यांचा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. याचवेळी मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. 

यावेळी बोलातना मुख्ममंत्री उद्धव ठाकरे म्हणाले,  पुन्हा एकदा सर्वांना आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे. कोरोनाच्या काळात नागरिकांच्यावतीने पाळण्यात येणारे सामाजिक मिटवू दे, वारकऱ्यांनी तुडूंब,आनंददायी, भगव्या पताक्यांनी भरलेलं पंढरपूर पहावयाचे आहे, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. आज मंदिरात मी वृक्षारोपण केले. हा परंपरेचा वृक्ष असून याची पाळेमुळे जगभरात आणखी घट्ट होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत विठूरायाच्या महापूजेसाठी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत: गाडी चालवत पंढरपूरच्या नगरीत पोहचले.  भर पावसात मुख्यमंत्री गाडी चालवत महापूजेसाठी उपस्थितीत राहिले आणि आज पहाटे शासकीय  महापूजा संपन्न झाली. 

यंदा वर्ध्याच्या कोलते दांपत्याला विठ्ठलाच्या महापूजेचा मान

सतत विठ्ठलाच्या सेवेत भक्तिमय होऊन वर्ध्यातील विठ्ठल मंदिरात वीणा वाजवण्याचे काम करणाऱ्या आणि गेल्या 49 वर्षांपासून पंढरीची वारी करणाऱ्या केशव कोलते यांना पंढरपूर येथील विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मान मिळाला. कोलते (७१) हे नियमितपणे विठ्ठलनामात तल्लीन होत शहरातील विठ्ठल मंदिरात 20 वर्षांपासून वीणा वाजवतात.
पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी मुख्यमंत्र्यांचे श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात आगमन झाले. प्रारंभी श्री विठ्ठलाची आणि त्यानंतर श्री रुक्‍मिणी मातेची षोडशोपचार पूजा केली.

दरम्यान, संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसमुळे विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीने दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी विठ्ठल -रखुमाईच्या भक्तांसाठी आजच्या या दिवशी झेंडू आणि ऑरकेट, गुलझडी, गुलाब ,पिंक डीजे, कामिनी फुलांनी पंढरपूरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक आरास केली आहे. विठूरायाचा आणि रुक्मिणी मातेचा गाभारा, सभामंडप, मंदिरातील खांब या सर्व ठिकाणी आकर्षक मुलांच्या माळांची सजावट केली आहे. पुण्यातील विठ्ठल भक्त भारत भुजबळ यांच्याकडून ही मंदिर सजावट करण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी