सोलापूर : काही महिन्यांपूर्वी देशभरात नाव करणारे ग्लोबल अवार्ड मिळवलेले रणजित डिसले गुरुजी कारवाईच्या कचाट्यात अडकले आहेत. डिसले गुरुजी यांच्यावर सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकाऱ्यांनी गंभीर आरोप केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, डिसले गुरुजी यांच्यावर कायदेशीर कारवाई देखील केली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे. त्याचं कारण देखील तसचं आहे कारण डिसले हे गेल्या तीन वर्षांपासून आपल्या शाळेकडे फिरकलेच नाही, तीन वर्षांच्या काळात डिसले गुरुजींनी काय केलं? असा सवाल उपस्थित करत डिसले गुरुजींवर कायदेशीररित्या कारवाई करण्यात येणार आहे असं शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर याबाबत चौकशी समितीचा अहवाल जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे प्राप्त झाला असल्याचं शिक्षणाधिकारी यांनी म्हटलं आहे.
रणजितसिंह डिसले यांनी दीड महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेकडे अध्यापन रजा मिळवण्यासाठी अर्ज केला होता. काल जेव्हा डिसले गुरुजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे भेटीला गेले होते तेव्हा सादर केलेल्या अर्जामध्ये त्रुटी असल्याचं त्यांना सांगितलं गेलं आहे. दरम्यान, अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी प्रतिष्ठित फुलब्राईट स्कॉलरशिप रणजितसिंह डिसले यांना जाहीर झाली आहे. यासंदर्भात संशोधन करण्यासाठी त्यांना सहा महिने अमेरिकेत जाऊन अभ्यास करायचे आहे. यासाठी त्यांनी रजा मागितली होती. मात्र, त्यांना आता अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अमेरिकन सरकारकडून फुलब्राईट शिष्यवृत्ती दिली जात असून हे ७५ वे वर्ष आहे.
२०२१ मध्ये जगभरातील ४० शिक्षकांना ही प्रतिष्ठेची स्कॉलरशिप जाहीर झाली आहे
लेट्स क्रॉस द बॉर्डर या उपक्रमाच्या माध्यमातून ते जगभरातील अशांत देशातील मुलांना एकत्र आणून त्यांच्यात अहिंसेच्या विचारांचा प्रसार करण्याचे काम ते करत आहेत
पीस इन एज्युकेशन या विषयावर अमेरिकेतील विद्यापीठात अधिक संशोधन करण्यासाठी त्यांना ही स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली
याच विषयावर अधिक संशोधन करण्याची संधी डिसले गुरुजींना या स्कॉलरशिपच्या माध्यमातून मिळणार आहे
रणजीत डिसले यांना ग्लोबल टीचर अवार्ड (Global Teacher Award) विजेते शिक्षक आहेत. त्यांना सध्या अमेरिकन सरकारकडून फुलब्राईट शिष्यवृत्तीची संधी देखील मिळाली असली तरी दुसरीकडे शिक्षणाधिकाऱ्यांनी कायद्याचा बडगा उगारत दिलेला कारवाईचा इशारा दिला असल्याने फुलब्राईट स्कॉलरशिपही हातातून जाण्याची शक्यता रणजीत डिसले यांनी वक्त केली आहे. त्याचबरोबर शिक्षक म्हणून सरकारी नोकरी सोडण्याच्या मनस्थितीत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ग्लोबल टीचर अॅवार्ड मिळाल्यापासून शिक्षण विभागातल्या काही अधिकाऱ्यांनी त्रास दिला.पैशाची मागणी केली. एवढंच नाही तर फुलब्राईट स्कॉलरशिपसाठी केलेल्या अर्जावरही अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. असं त्यांनी म्हटल आहे.