सोलापूर : अक्कलकोट तालुक्यात बुधवारी दुपारी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे बोरगावातील अनेक लोकांच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. दोन तास झालेल्या पावसाने. बोरगावच्या आसपासच्या अनेक ओढ्याना पूर आला आहे. पावसाचे पाणी अनेकांच्या घरात शिरले आहे. अनेक पूल पाण्यासाठी गेल्याने परिसरातील गावांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (Heavy rains in Akkalkot taluk!, the village roads are in the form of rivers)
अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव, घोळसगाव, बादोले, वागदरी, शिरवळ सापळे आदी भागात बुधवारी दुपारी दोन वाजता पाऊस सुरु झाला. कामात शेतकरी व्यस्त असताना अचानक आलेल्या पावसामुळे शेतीची कामे करत असताना तारांबळ उडाली. अडीच तास पडलेल्या पावसाने रौद्ररूप धारण केले होते. काही क्षणातच संपूर्ण भाग जलमय झाला.त्यामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान केले. काही भागात उभे असलेले उसाचे पीक आडवे पडले असून मुग उडीद सोयाबीन तूर आदी पिके ज्यादा पावसामुळे खराब होण्याच्या मार्गावर आहेत.
बोरगाव गावातून खूप मोठ्या पाण्याचा प्रवाह वाहत असल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने अनेकांचे नुकसान झाले आहे.मुसळधार पावसामुळे कुरनुर धरणातून 600 क्यूसेकने विसर्ग करण्यात आला आहे. तर घोळसगाव येथील तलाव 100 टक्के भरला असून ओव्हरफ्लो झाला आहे. बोरगाव येथील पीर राजेबागसवार साठवण तलाव 100 टक्के भरले असून बोरगावचा ओढा दुथडी भरून वाहत आहे.