हा मान मला मिळेल असा मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता: उद्धव ठाकरे

सोलापूर
रोहित गोळे
Updated Jul 01, 2020 | 16:35 IST

Uddhav Thackeray in Pandharpur: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पंढरपूरमध्ये शासकीय महापूजा पार पडली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी यांनी उपस्थितीत असणाऱ्या मोजक्या वारकऱ्यांना मार्गदर्शन केलं. 

Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडली पंढरपूरमधील शासकीय महापूजा
  • 'मी मनापासून सांगतोय, हा मान मला मिळेल असा मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता'
  • कोरोनाचं संकट दूर व्हावं असं साकडं मुख्यमंत्र्यांनी विठू चरणी घातली आहे

पंढरपूर: 'मी मनापासून सांगतोय, हा मान मला मिळेल असा मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता. मान जरूर मिळाला पण अशा परिस्थितीमध्ये पूजा करावी लागेल हा ही कधी स्वप्नात मी विचार केला नव्हता.' अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्या हस्ते विठ्ठल आणि रुक्मिणी यांची शासकीय महापूजा पार पडल्यानंतर त्यांनी उपस्थित वारकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. (Ashadi Ekadashi 2020 Pandharpur) कोरोनाचं संकट दूर होवो आणि संपूर्ण जगाला आनंदी, मोकळं आणि निरोगी जीवन जगण्याचं भाग्य प्राप्त होवो. असं साकडंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी विठ्ठला चरणी घातलं आहे.

पाहा मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले: 

'आपण सगळे जणं माऊलीचे भक्त म्हणून इथे जमलेलो आहोत. इथे कोणी मुख्यमंत्री नाही, मंत्री नाही ना कोणी अधिकारी. माऊलीच्या समोर सगळे सारखेच आहेत. मी मनापासून सांगतोय, हा मान मला मिळेल हे मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता. मान जरूर मिळाला पण अशा परिस्थितीमध्ये पूजा करावी लागेल हा ही कधी स्वप्नात मी विचार केला नव्हता. मी इथे महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण विश्वाच्या वतीने माऊलीच्या चरणी साकडं घालायला आलो आहे व साकडं घातलं आहे.' 

'मला नक्की विश्वास आहे, आजपर्यंत अनेकदा माऊलीचे चमत्कार ऐकत आलेलो आहोत, कित्येक वर्षांपासून ही परंपरा चालू आहे, आता मला त्या चमत्काराची परंपरा बघायची आहे. मी माऊलीला साकडं घातलं आहे की, आता आम्हाला चमत्कार बघायचा आहे, आम्हाला चमत्कार दाखव. कारण मानवाने हात टेकले आहेत. आपल्याकडे औषध नाही, काही नाही. हे तोंडाला पट्टी बांधून कसं जीवन जगायचं? म्हणून मी साकडं घातलं आहे, आज आषाढी आहे, आजपासूनच कोरोनाचे संकट नष्ट होवो आणि संपूर्ण जगाला आनंदी, मोकळं आणि निरोगी जीवन जगण्याचं भाग्य प्राप्त होवो असे मी विठुरायाच्या चरणी साकडं घातलेलं आहे, मातेच्या चरणी साकडं घातलेलं आहे.' असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी