विठ्ठलाची महापूजा अजित पवार यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न

सोलापूर
अजहर शेख
Updated Nov 26, 2020 | 09:23 IST

Mahapuja of Vitthal was performed by Ajit Pawar: श्री विठ्ठलाच्या महापूजेसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Mahapuja of Vitthal was performed by Ajit Pawar
विठ्ठलाची महापूजा अजित पवार यांच्याहस्ते सपत्नीक संपन्न   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • उपमुख्यमंत्र्यांसमेवत भोयर या दाम्पत्यानेही श्री विठ्ठलाची महापूजा केली.
  • कार्तिकी एकादशी प्रबोधिनी एकादशी, देव उठनी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते
  • कमी मान्यवरांच्या उपस्थितीत यंदाची कार्तिकी एकादशीची महापूजा संपन्न झाली

पंढरपूर: पंढरपूरच्या (pandharpur) श्री विठ्ठल मंदिरात (vitthal rukmini temple) कार्तिकी एकादशीनिमित्त (kartiki ekadashi) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्याहस्ते सपत्नीक महापूजा संपन्न झाली. यावेळी, श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेच्या मानाच्या वारकरी दाम्पत्याचा मान कवडुजी नारायण भोयर ( वय ६४) व कुसुमबाई कवडूजी भोयर ( वय ५५ रा.मु.डौलापूर, पो.मोझरी शेकापूर, ता.हिंगणघाट, जि. वर्धा) यांना मिळाला. पहाटे अडीच वाजता पूजेला सुरुवात झाल्यानंतर ३.३०  वाजण्याच्या सुमारास विठ्ठलाच्या लाईव्ह दर्शनासह महापूजेचा हा सोहळा पार पडला. उपमुख्यमंत्र्यांसमेवत भोयर या दाम्पत्यानेही श्री विठ्ठलाची महापूजा केली.

कमी मान्यवरांच्या उपस्थितीत यंदाची कार्तिकी एकादशीची महापूजा संपन्न झाली

यापूर्वी आषाढी एकादशीलाही मुख्यमंत्र्यांच्याहस्ते सपत्नीक महापूजा करताना, कोरोनामुळे निवडक व्यक्तींच्या उपस्थितीतच महापूजा संपन्न झाली होती. श्री विठ्ठलाच्या महापूजेसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय कमी मान्यवरांच्या उपस्थितीत यंदाची कार्तिकी एकादशीची महापूजा संपन्न झाली.

कार्तिकी एकादशी प्रबोधिनी एकादशी, देव उठनी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते

भगवान विष्णूचं चातुर्मास संपवून कार्तिकी एकादशी दिवशी उठतात. त्यामुळे देव शयनी नंतर चार महिन्यांनी येणारी ही देव उठनी एकादशी देखील खास असते. कार्तिकी एकादशी प्रबोधिनी एकादशी (Prabodhini Ekadashi) किंवा देव उठनी एकादशी (Dev Uthani Ekadashi) म्हणून देखील ओळखली जाते. निद्रा अवस्थेतून उठल्यानंतर पुन्हा नव्या शुभ पर्वाला, विवाह सोहळ्यांना सुरूवात होते.

२५ आणि २६ नोव्हेंबर या दिवशी पंढरपूर शहर आणि जवळपासच्या १० गावांमध्ये संचारबंदी लागू

समितीने घेतलेल्या निर्णयानुसार या वर्षी कार्तिकी यात्रा प्रतिकात्मक पद्धतीने होणार असून २५ आणि २६ नोव्हेंबर या दिवशी पंढरपूर शहर आणि जवळपासच्या १० गावांमध्ये संचारबंदी लागू असणार आहे. दरम्यान सरकारने राज्यातील मंदिरे उघडण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता. याच पार्श्वभूमीवर १६ नोव्हेंबरपासून शासनाच्या आदेशानुसार श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी ऑनलाईन' पद्धतीने बुकींग करून आलेल्या भाविकांना प्रवेश देण्यात येत आहे.

लॉज चालकांनाही पोलिसांनी बजावल्या नोटिसा

पंढरपूर शहरासह आसपासच्या काही गावामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शहरातील मठांमधून आणि लॉजमधून आधी कोणी येऊन राहू नये. यासाठी मठ आणि लॉज मालकांना मठ आणि लॉजमधून कोणालाही राहण्यास देऊ नये, अन्यथा कारवाई केली जाईल, अशा प्रकारच्या नोटिसा पोलिसांनी दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे यात्रा काळात ज्या लॉजमधून नेहमीपेक्षा दुपटीने, तिपटीने दर आकरणी करून रूम भाड्याने दिल्या जात असत, त्या रूम सध्या कुलूप लावून बंद ठेवण्याची वेळ लॉज मालकांवर आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी