Ranjitsinh Disale: सोलापुरातील रणजितसिंह डिसले यांना ७ कोटींचा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर

Global Teacher Prize 2020: महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील रणजितसिंह डिसले यांना ग्लोबल टीचर प्राईझ पुरस्कार जाहीर झाला आहे. रणजितसिंह डिसले हे सोलापूर जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत.

Ranjitsinh disale teacher of solapur maharashtra won 1 million annual global teacher prize 2020
सोलापुरातील रणजितसिंह डिसले यांना ७ कोटींचा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर   |  फोटो सौजन्य: Twitter

सोलापूर : महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात असलेल्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेल्या रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) यांना जागतिक स्तरावरील मानाचा असा ग्लोबल टीचर प्राईझ पुरस्कार (Global Teacher Prize 2020) जाहीर झाला आहे. मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि क्यूआर कोडेड पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून (QR coded textbook revolution) राज्यातच नाही तर देशात शिक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

रणजितसिंह डिसले हे सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी गावातील जिल्हापरिषद शाळेत शिक्षक आहेत. या पुरस्कारासाठी जगभरातील १४० देशांतील १२ हजारांहून अधिक शिक्षकांमधून रणजितसिंह डिसले हे अंतिम विजेता ठरले.

७ कोटी रुपयांचा पुरस्कार 

७ कोटी रुपये असे रणजितसिंह डिसले यांना जाहीर झालेला ग्लोबल टीचर प्राईझ पुरस्काराचे स्वरुप आहे. आपल्याला जाहीर झालेल्या या पुरस्काराच्या एकूण रक्कमेपैकी ५० टक्के रक्कम ही फायनल राऊंडमधील ९ शिक्षकांना देणार असल्याचं रणजितसिंह डिसले यांनी जाहीर केलं आहे.

रणजितसिंह डिसले म्हणाले, कोविड-१९ काळात देशभरातील शिक्षण व्यवस्थेत अडथळा निर्माण झाला मात्र, असे असले तरी या कठीण काळात शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याला चांगले शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्नशील आहेत. शिक्षक विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवत असतात. शिक्षण देण्यात आणि सर्वांपर्यंत पोहोचवण्यावर शिक्षक नेहमीच विश्वास ठेवतात. माझा विश्वास आहे की, आम्ही सर्वजण एकत्र मिळून जग बदलू शकतो कारण शेअरिंग ईस ग्रोविंग (sharing is growing).

अंतिम फेरीतील ९ स्पर्धक शिक्षकांना रणजितसिंह डिसले यांनी ५० टक्के रक्कम देण्याचं जाहीर केलं आहे. म्हणजेच अंतिम फेरीतील ९ स्पर्धकांना प्रत्येकी ५५,००० डॉलर्सहून अधिक पैसे मिळतील. 

रणजितसिंह डिसले यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही ट्वीट करत त्याचं अभिनंदन केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये भगतसिंह कोश्यारी यांनी लिहिलं, "सोलापुरच्या परितेवाडी शाळेतील विद्यार्थीप्रिय शिक्षक श्री रणजितसिंह डिसले यांना लंडनस्थित वर्खी फाऊंडेशनच्या विद्यमाने दिला जाणारा १- दशलक्ष डॉलर पुरस्कार रक्कम असलेला ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल श्री डिसले यांचे मन:पूर्वक अभिनंदन."

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी