रिंगणच्या संत नरहरी सोनार विशेषांकाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्रकाशन

गेली नऊ वर्षं सुरू असलेली परंपरा यावर्षी कोरोनाकाळातही सुरू राहिली. रिंगण या वार्षिकाचं पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीच्या पहाटे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन झालं.

Release of Sant Narhari Sonar Special Issue by Chief Minister Uddhav Thackeray
रिंगणच्या संत नरहरी सोनार विशेषांकाचं प्रकाशन 
थोडं पण कामाचं
  • गेली नऊ वर्षं सुरू असलेली परंपरा यावर्षी कोरोनाकाळातही सुरू राहिली. रिंगण या वार्षिकाचं पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीच्या पहाटे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन झालं.
  • संतपरंपरेचा सामाजिक सांस्कृतिक मागोवा घेणाऱ्या रिंगणचं यंदा नववं वर्षं आहे.
  • २०१२ला रिंगणचा पहिला अंक प्रकाशित झाला होता. तेव्हापासून गेली ९ वर्षं हा आषाढी अंक प्रकाशित होतोय. 

पंढरपूर  : गेली नऊ वर्षं सुरू असलेली परंपरा यावर्षी कोरोनाकाळातही सुरू राहिली. रिंगण या वार्षिकाचं पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीच्या पहाटे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन झालं. संतपरंपरेचा सामाजिक सांस्कृतिक मागोवा घेणाऱ्या रिंगणचं यंदा नववं वर्षं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर तसंच मानाचे वारकरी यांच्या उपस्थितीत रिंगणच्या संत नरहरी सोनार विशेषांकाचं प्रकाशन झालं. २०१२ला रिंगणचा पहिला अंक प्रकाशित झाला होता. तेव्हापासून गेली ९ वर्षं हा आषाढी अंक प्रकाशित होतोय. 

रिंगणचे संपादक सचिन परब यंदाच्या विशेषांकाविषयी म्हणाले, 'आपल्या जगण्यातून महाराष्ट्राला समन्वयाचा रस्ता दाखवणारे संत नरहरी सोनार यांचा शोध एकाच वेळेस आव्हानात्मक आणि आनंददायक होता. पंढरपूर, पैठण, आळंदी, त्र्यंबकेश्वर, वाराणसी, नवगण राजुरी, आटपाडी, धुळे, नेवासा, परभणी इतक्या ठिकाणी नरहरीरायांच्या प्रभावखुणा शोधण्याचा केलेला प्रयत्न, हे यंदाच्या अंकाचं वैशिष्ट्य ठरावं.'

संत नरहरी सोनार यांच्याविषयी ३७ लेख असणारा रिंगणचा अंक १६४ पानांचा आहे. संपूर्ण आर्टपेपरवर असणारा हा देखणा अंक फोटो आणि चित्रांनी सजला आहे. यात डॉ. सदानंद मोरे, डॉ. रंगनाथ तिवारी, डॉ. मंगला सिन्नरकर, डॉ. श्यामसुंदर मिरजकर, डॉ. रुपाली शिंदे, नंदन रहाणे, नीलेश बने, डॉ. ओमश्रीश श्रीदत्तोपासक संजीव खडके, ग. शां. पंडित यांच्यासह अनेक मान्यवरांनी लेखन केलंय. 

लवकरच अंक महाराष्ट्रभरातल्या प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे विक्रीसाठी उपलब्ध असेल. अंक घरपोच हवा असेल तर संपर्क - 
प्रदीप पाटील ९८६०८३१७७६ । ९४२१०५५२०६ 
सुधीर शिंदे ९८६७७५२२८० । ९९६०३७४७३९

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी