सोलापूर : सोलापुरात माणुसकीचे दर्शन घडविणारी घटना समोर आली आहे. एका अत्यावस्थ रुग्णाला घेऊन येणारी रुग्णवाहिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात येथे बंद पडली. समाजिक भान असणाऱ्या काही तरुणांनी बंद पडलेली रुग्णवाहिका धक्का मारत-मारत रुग्णलयात पोहचवली.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहोळ येथे एक रुग्ण बेशुद्ध पडला होता. त्याला घेऊन रुग्णवाहिका ही सोलापुरात आली. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पोहचल्यानंतर रुग्णवाहिका बंद पडली. रुग्णवाहिका चालू होत नसल्यानं रुग्णवाहिकेतील नातेवाईकांनी रडण्यास सुरुवात केली. हे चित्र पाहून तिथे असलेले सामाजिक कार्यकर्ते राज सलगर आणि इतर तरुण सरसावले. त्यांनी बॅटरी बंद पडली, असे समजून गाडीला धक्का देऊन ती सुरू करण्याचा प्रयत्न केला.
पण त्यास यश आले नाही. त्यामुळे ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी आक्रोश सुरू केला. त्यानंतर या तरुणांनी या अॅम्ब्युलन्सला धक्का देत हॉस्पिटलच्या दिशेने नेली. त्यानंतर काही अंतरावर गेल्यानंतर एका रिक्षाचालकाने या अॅम्बुलन्सला धक्का देत रुग्णाला सुखरूप हॉस्पिटल मध्ये पोहोचवले. यातून आपल्याला समाजिक बांधिलकी माणुसकीचं दर्शन घडलं पण त्याच बरोबर आपल्याकडून आरोग्य सेवा कशी आहे याची जाणीव झाली आहे. दरम्यान अशा प्रकारच्या रुग्णवाहिकांचे ऑडिट करावे अशी मागणी या समाज कार्यकर्त तरुणांनी केली.