Solapur Rain, सोलापूर : यावर्षी राज्यात चांगला पाऊस झाल्याने काही ठिकाणी शेतकरी समाधानी झाले आहेत. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांचा पिकाचे मोठे नुकसान देखील झाल्याचे पहायला मिळाले आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने नागरिकांना बेघर होण्याची वेळ देखील आली असल्याचे चित्र सोलापूर जिल्ह्यात पहायला मिळत आहे. सोलापूर शहरापासून अवघ्या पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या हिप्परगा तलावात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साठा झाला आहे. मोठ्या प्रमाणात पाणी साठा झाल्याने याचा फटका शेजारी राहणाऱ्या नागरिकांना बसू लागला असल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान, तलावाशेजारी राहणाऱ्या लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरत असून लोकांना घरं सोडून जाण्याची वेळ आली आहे.
अधिक वाचा : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी पुन्हा पुढे ढकलली
मिळालेल्या माहितीनुसार, हिप्परगा तलावाशेजारी राहणाऱ्या लोकांना पावसाळ्यात मोटा त्रास सहन करावा लागत आहे. पाणी जास्त पडल्याने तलावाशेजारी राहत असलेल्या लोकाच्या घरात पाणी घुसते. दरवर्षी हीच स्थिती असल्याने पावसाळ्यामध्ये या लोकांना आपली घर सोडून दुसरीकडं स्थलांतरित व्हावं लागतं. जवळपास ४० घरांमध्ये सध्या पाणी शिरल्यामुळं या सर्व कुटुंबांना आपली घरे सोडावी लागली आहेत. तर अजून एक दोन दिवस पाऊस पडल्यास उरलेल्या दहा ते पंधरा कुटुंबांना देखील आपली घरे सोडावी लागणार असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. दरम्यान, याठिकाणी राहणारे लोक हे अनेक वर्षांपासून त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रशासनाकडे, स्थानिक आमदारांकडे मागणी करत आहेत. मात्र त्यांच्या मागणीकडे कोणाही लक्ष देत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
अधिक वाचा : नुपूर शर्मांचा जीव घेणार होता IS सुसाईड बॉम्बर
घरात पाणी घुसत असल्याने नागरिकाना घर सोडून निघून जाव लागत आहे. त्यामुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. याच कारणामुळे त्यांच्याकडून आता तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. आम्ही गेल्या १० वर्षापासून इथे राहत आहोत. आजपर्यंत आमचा कोणी विचार केला नाही. पाणी आलं की आम्ही घरं सोडून जात आहोत. मतदान आले की नेते आमच्याकडे येतात, मतदान झालं की परत ते येत नाहीत अशी माहिती नागरिकांनी दिली. त्यामुळं राहायला आम्हाला घरकूल मिळावं अशी मागणी येथील नागरिकांनी प्रशासनाला केली आहे.
अधिक वाचा : पोलीस करत होते पाठलाग, त्याने चालवलं डोकं
दरम्यान, पुढे बोलताना स्थानिक नागरिक म्हणाले की, या पाण्यात साप, विंचू आहेत. त्यामुळं भीती वाटत असल्याची माहिती नागरिकांना दिली. आत्तापर्यंत आम्हाला एवढा त्रास झाला नाही, पण मागच्या दोन तीन वर्षात आम्हाला जास्त त्रास होत असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. महापालिकेने आणि सरकारनं याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे, कारण दिवसेंदिवस धोका वाढत असल्याचंही नागरिकांनी म्हटलं आहे.