पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीने घेतला मोठा निर्णय

सोलापूर
Updated Dec 09, 2019 | 22:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

Vitthal Rukhmini Mandir: पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या समितीने एक मोठा निर्णय घेतला आहे. मंदिर समितीने एक बैठक आयोजित करत मंदिरात मोबाइल बंदीचा निर्णय घेतला आहे. 

vitthal rukhmini mandir pandharpur committee mobile banned temple devotees maharashtra marathi news
पंढरपूर विठ्ठल मंदिरात मोबाइल बंदी (फोटो सौजन्य: http://www.vitthalrukminimandir.org) 

पंढरपूर: देशभरातील कोट्यावधी भाविकांचे आणि वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या विठ्ठल मंदिरात दररोज भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात. मात्र, याच विठ्ठल मंदिरात भाविकांसाठी मोबाइल बंदी घेण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. हा निर्णय १ जानेवारीपासून लागू होणार आहे. मंदिरात मोबाइल नेण्यास बंदी घातल्याने आता यावरुन नवा वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

विठुमाऊलीच्या दर्शनासाठी आलेले भक्त हे विठुरायासमोर फोटो काढतात आणि त्यामुळेच मंदिरात मोबाइल बंदी करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. यापूर्वी सुद्धा सुरक्षेचं कारण सांगत मंदिर प्रशासनाने मंदिरात मोबाइल बंदी केली होती. यामुळे भाविकांना आपले मोबाइल हे मंदिराबाहेर लॉकरमध्ये पैसे देऊन ठेवावे लागत होते. यानंतर भाविकांनी तसेच वारकऱ्यांनी मंदिर समितीच्या या निर्णयाविरोधात आवाज उठवला. अखेर मंदिर प्रशासनाने आपला निर्णय मागे घेतला होता. पण आता पुन्हा मोबाइल बंदी केल्याने यावरुन वाद होण्याची शक्यता आहे.

सध्याच्या काळात मोबाइल फोन ही सर्वांची एक प्रकारे गरज झाली आहे. प्रत्येकाकडेच मोबाइल फोन आपल्याला पहायला मिळतो. गरजेच्यावेळी तसेच आपातकालीन परिस्थितीत मोबाइल फोनचा उपयोग फार महत्वाचा ठरतो. मात्र, आता मंदिर प्रशासनाने मंदिरात मोबाइल बंदीचा निर्णय घेतल्याने त्याचा फटका सर्वसामान्य भाविक, वारकऱ्यांना बसणार हे निश्चित आहे. तसेच मंदिर प्रशासनाने घेतलेल्या या वादग्रस्त निर्णयामुळे आता पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे.

'या' काळात ऑनलाईन दर्शन बुकिंग बंद 

वर्ष अखेर तसेच नाताळ सणानिमित्त दर्शन रांगेतील भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाने एक निर्णय घेतला आहे. मंदिर प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, भाविकांच्या सोयीसाठी २२ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०१९ या काळात ऑनलाईन दर्शन बुकिंग बंद केलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी