बार्शीत रेमडीसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार उघड, स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आली धक्कादायक माहिती

सोलापूर
Updated Apr 08, 2021 | 15:37 IST

ramdisiver injection black marketing in barshi : रेमडीसिवीर इंजेक्शनची वाढती मागणी लक्षात घेऊन इंजेक्शनच्या काळाबाजाराचा भांडाफोड सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे झाला आहे.

थोडं पण कामाचं

  • स्वतः च्या कामगाराला पाठवून इंजेक्शनचा काळाबाजार आणला उघडकीस
  • ४ हजार रुपयाला एक रेमडीसिव्हर इंजेक्शन
  • औषध प्रशासन विभागाचे नामदेव भालेराव यांच्याकडे रीतसर तक्रार

सोलापूर : कोरोनाच्या (corona) संकटात देखील रुग्णांना लुटण्याची वृत्ती पहायला मिळत आहे. एकीकडे रेमडीसिवीर इंजेक्शनची (ramdisever injection) वाढती मागणी लक्षात घेऊन इंजेक्शनच्या काळाबाजाराचा भांडाफोड सोलापूर जिल्ह्यातील (solapur district) बार्शी (barshi) येथे झाला आहे. बार्शी शहरातील तुळशीराम रोडवर असलेल्या शहा हॉस्पिटलच्या मेडिकल स्टोअरमध्ये रेमडीसिवीर या इंजेक्शनचा काळा बाजार होत असल्याचा दावा बार्शी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा होलसेल औषध विक्रेते राजन ठक्कर यांनी केला आहे.

स्वतः च्या कामगाराला पाठवून इंजेक्शनचा काळाबाजार आणला उघडकीस

दरम्यान, मिळालेली माहिती अशी आहे की, राजन ठक्कर यांनी आपल्या स्वतःच्या कामगाराला शहा हॉस्पिटलच्या मेडिकल स्टोअरमध्ये पाठवले होते. सदर मेडिकलमध्ये पाठवत असताना त्यांनी सदर घटनेचे याचे स्टिंग ऑपरेशन देखील केले आहे. मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध असणारा व्यक्ती इंजेक्शनविषयी काय बोलतो याचा व्हिडीओ देखील  त्यांनी स्टिंग ऑपरेशनमध्ये उघडकीस आणले आहे. त्यांनी सदर व्हिडीओ अन्न व औषध विभागाला आणि सर्व माध्यमांना पाठवला असून, कोरोनाकाळात असंवेदनशीलता दाखवणाऱ्या मेडिकल स्टोअरवर कडक कारवाई करण्याची मागणी देखील सध्या केली जात आहे.

४ हजार रुपयाला एक रेमडीसिवीर इंजेक्शन

सदर स्टिंग ऑपरेशन मध्ये एक रेमडीसिवीर इंजेक्शनची किंमत ४ हजार रुपये असल्याचे मेडिकल स्टोअर वाला सदर युवकांना बोलत आहे. त्याचबरोबर एकादा इंजेक्शन घेऊन गेल्यानंतर तो परत घेतले जाणार नाही. युवक काही पैसे कमी असल्याचे बोलत आहेत, मात्र पैसे कमी असल्यानंतर तो इंजेक्शन देता येणार नसल्याचेही बोलत आहे. दरम्यान, युवकानी पैसे ठेवल्यानंतर मेडिकल स्टोअरवाला पैसे लवकर घेत नसल्याचे देखील दिसून येत आहे. मात्र, काही वेळाने तो पैसे घेतो आणि रेमडीसिवीरइंजेक्शन युवकाना देतो. असं सदर स्टिंग ऑपरेशनमध्ये दिसून येत आहे.

औषध प्रशासन विभागाचे नामदेव भालेराव यांच्याकडे रीतसर तक्रार

स्टिंग करणारे राजन ठक्कर यांनी याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाचे नामदेव भालेराव यांच्याकडे सदर प्रकरणाची रीतसर तक्रार दिली असून, सदर स्टिंग ऑपरेशन केलेला व्हिडीओही त्यांना पाठवल्याचे सामाजिक कार्यकर्ते व होलसेल औषध विक्रेते राजन ठक्कर यांनी माध्यमांना माहिती दिली आहे. दरम्यान, काही नफेखोर मेडिकल चालक काळ्या बाजारात चढ्या भावाने रेमडीसीविर इंजेक्शनची विक्री करत आहेत. एकीकडे सोलापुरात रेमडीसीवीर इंजेक्शनसाठी कोरोना बाधित रुग्णाचे नातेवाईक रात्र-रात्र जागून काढत असल्याचे देखील समोर आले आहे.

 

यापुढेही आपण तहसीलदार आणि बार्शी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांच्याकडेही तक्रार करणार - राजन ठक्कर

 दरम्यान यापुढेही आपण तहसीलदार आणि बार्शी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांच्याकडेही तक्रार करणार असल्याचे देखील राजन ठक्कर यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे अॅप्रन घातलेला ज्ञानेश्वर नामक विक्रेता हा फार्मासिस्ट देखील नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे. ज्ञानेश्वर हा केवळ काळबाजार करण्यासाठी खुद्द डॉक्टरांनी बसविलेला व्यक्ती असल्याचेही ठक्कर यांनी सांगितले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी