उल्हासनगरमध्ये पाच मजली इमारत कोसळली 

ठाणे
रोहित गोळे
Updated Aug 13, 2019 | 16:40 IST

5 storey building collapsed: कल्याण नजीकच्या उल्हासनगरमध्ये एक पाच मजली इमारत आज सकाळी कोसळली. पण ही इमारत आधीच खाली करण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली. 

building_twitter
उल्हासनगरमध्ये पाच मजली इमारत कोसळली   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • पाच मजली इमारत कोसळली, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
  • इमारत कालच खाली करण्यात आल्याने दुर्घटना टळली
  • महापालिका आणि अग्निशमन दलाने वाचवले अनेकांचे प्राण

उल्हासनगर: कल्याणजवळील उल्हासनगर येथे आज (मंगळवार) सकाळी १० वाजेच्या सुमारास एक रहिवासी इमारत कोसळली. ही इमारत पाच मजली होती.  'महक' असं या इमारतीचं नाव असल्याचं समजतं आहे. सुदैवाने या इमारत दुर्घटेनत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, कालच (सोमवार) ही इमारत खाली करण्यात आली होती. त्यामुळे एक अतिशय मोठी दुर्घटना टळली. उल्हासनगर महापालिका प्रशासन आणि अग्निशमन दलाने वेळीच कारवाई केल्याने शेकडो जणांचे प्राण वाचले आहेत. या इमारतीत जवळजवळ ३१ कुटुंब राहत होती. कालच ही इमारत खाली करुन ती सील करण्यात आली होती. 

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर येथील लिंक रोड भागात महक ही इमारत होती. या इमारतीला बरीच वर्ष होऊन गेली होती. त्यामुळे ती धोकादायक अवस्थेत पोहचली होती. पण महत्त्वाची बाब म्हणजे ही इमारत पालिकेने धोकादायक म्हणून जाहीर केली नव्हती. दरम्यान, काल येथील नागरिकांच्या असं लक्षात आलं की, इमारतीला अतिशय मोठे तडे गेले असून ती चक्क एका बाजूला झुकली आहे. ही धक्कादायक बाब लक्षात येताच येथील नागरिकांनी तात्काळ महापालिका प्रशासन आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. या गोष्टीचं गांभीर्य ओळखून पालिका प्रशासन आणि अग्निशमन दलाने झटपट निर्णय घेत येथे राहणाऱ्या सर्व कुटुंबांना त्यांच्या सामानासकट बाहेर काढलं. 

येथील कुटुंबीयांना बाहेर काढल्यानंतर ही इमारत लागलीच सील करण्यात आली होती. आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास ही इमारत पूर्णपणे कोसळली. त्यानंतर महापालिका प्रशासनाने घटनास्थळी जात ढिगारा उपसण्याचं काम सुरु केलं. दरम्यान, महापालिका प्रशासन आणि अग्निशमन दलाने योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याने आज अतिशय मोठी दुर्घटना टळली. त्यामुळे या इमारतीतील रहिवाशांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत. पण याच वेळी असा प्रश्नही निर्माण झाला आहे की, इमारत मोडकळीस येऊन देखील पालिकेचं त्याकडे आधीच लक्ष का गेलं नव्हतं? 

दरम्यान, मागील काही दिवसांमध्ये इमारत, भिंत कोसळून आतापर्यंत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मागील महिन्यातच पुण्यात दोन ठिकाणी, मुंबईत एका ठिकाणी आणि कल्याणमध्ये एका ठिकाणी भिंत कोसळून अनेकांचे प्राण गेले होते. तर ३१ जुलैलाच सोलापूरमधील करमाळा येथील बँक ऑफ महाराष्ट्र असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. याशिवाय काही दिवसांपूर्वीच मुंबईतील डोंगरी येथे केसरबाई ही चार मजली निवासी इमारत कोसळली होती. ज्यामध्ये १४ जणांचा बळी गेला होता. ही इमारत जवळजवळ १०० वर्ष जुनी होती. या इमारतीत १५ कुटुंब राहत होती. ही इमारत एका ट्रस्टच्या नावावर होती. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर केली होती. तर जखमींना देखील ५० हजारांची मदत जाहीर केली होती. 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी