शिवसेनेचे माजी आमदार अनंत तरेंचे निधन

शिवसेनेचे माजी आमदार आणि ठाणे शहराचे माजी महापौर अनंत तरे (६७) यांचे निधन झाले.

anant tare passed away
शिवसेनेचे माजी आमदार अनंत तरेंचे निधन 

थोडं पण कामाचं

  • शिवसेनेचे माजी आमदार अनंत तरेंचे निधन
  • काही दिवसांपासून होते आजारी
  • खासगी हॉस्पिटलमध्ये निधन

ठाणे: शिवसेनेचे माजी आमदार आणि ठाणे शहराचे माजी महापौर अनंत तरे (६७) यांचे निधन झाले. ते शिवसेनेच्या तिकिटावर आमदार झाले. विधान परिषदेवर अनंत तरे २००० ते २००६ या कालावधीत आमदार म्हणून कार्यरत होते. याआधी तरे ठाणे शहराचे महापौर होते. (anant tare passed away)

मागील काही दिवसांपासून आजारी असलेल्या अनत तरेंवर ठाण्यातील ज्युपिटर या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. तिथेच संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. अनंत तरे यांच्यावर उद्या (मंगळवार, २३ फेब्रुवारी २०२१) दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, दोन नातवंडे, मुलगी, जावई आणि भाऊ असा परिवार आहे.

अनंत तरे २००८ पासून शिवसेनेचे उपनेते होते तसेच २०१५ पासून ते पालघर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख म्हणून कार्यरत होते. कोळी समाजातून आलेल्या अनंतर तरे यांनी ठाणे जिल्ह्यात शिवसेनेसाठी योगदान दिले. आनंद दिघे यांच्या कार्यामुळे शिवसेनेचे ठाण्यातील महत्त्व प्रचंड वाढले. या वास्तवाचे भान ठेवून शिवसेनेचे नागरिकांच्या मनातील स्थान कायम राखण्यासाठी अनंत तरे यांनी काम केले. पण एकनाथ शिंदे यांच्यासारखा नवा आक्रमक नेता सक्रीय झाल्यानंतर हळू हळू तरेंचे ठाणे जिल्ह्यातील महत्त्व कमी झाले. पण अखेर पर्यंत ते सार्वजनिक जीवनात सक्रीय होते. एकनाथ शिंदे आणि अनंत तरे यांनी एकमेकांना साथ देत शिवसेना ठाणे आणि पालघर जिल्ह्यात वाढवण्याचे काम केले.

ठाणे शहराचे महापौर पद तीन वेळा भूषवण्याचा मान अनंत तरे यांना मिळाला. ते एकविरा देवस्थान ट्रस्ट, कार्ला तसेच अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे अध्यक्ष होते. ठाण्यात महापौर पदाची हॅटट्रिक साधणारे ते एकमेव आहेत. विधान परिषदेसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या भास्कर जाधव यांचा पराभव करुन ते आमदार झाले होते. पण २०१४च्या निवडणुकीत त्यांचे तिकीट कापण्यात आले. या मुद्यावरुन ते नाराज झाले होते. 

दिड महिन्यात शिवसेनेच्या दोन नेत्यांचे निधन

शिवसेना या पक्षाची सुरुवात मुंबई-ठाणे पट्ट्यात झाली. पक्ष वाढवण्यासाठी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाला शिरसावंद्य मानून मुंबई-ठाणे पट्ट्यात अविश्रांत मेहनत घेणाऱ्या, जनसंपर्क वाढवणाऱ्या अशा दोन नेत्यांचेे दिड महिन्यांत निधन झाले. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का आहे. याच वर्षी (२०२१) सोमवारी ११ जानेवारी रोजी शिवसेनेचा झुंजार कामगार नेता अशी ओळख असलेल्या सूर्यकांत महाडिक यांचे अल्पशा आजाराने चेंबूरच्या झेन हॉस्पिटलमध्ये निधन झाले. यानंतर आज (सोमवारी) २२ फेब्रुवारी रोजी अनंत तरे यांचे खासगी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. 

सूर्यकांत महाडिक शिवसेनेच्या (ShivSena) भारतीय कामगार सेना (Bhartiya Kamgar Sena - BKS) या संघटनेचे सलग २० वर्ष समर्थपणे नेतृत्व करत होते. त्यांच्या कार्यकाळात भारतीय कामगार सेना (भाकासे) मोठी आणि सामर्थ्यशाली झाली. याच पद्धतीने अनंत तरे यांच्या कार्यकाळात ठाण्यात शिवसेनेची राजकीय ताकद आणखी वाढली. याच कारणामुळे ज्येष्ठ नेत्यांच्या निधनाने शिवसेनेच्या युवा पिढीने मोठा अनुभव गमावला, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. कोळी समाजातून आलेल्या अनंत तरे यांनी मुंबई-ठाणे पट्ट्यातील कोळी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी विशेष योगदान दिले, असे जाणत्या शिवसैनिकांनी सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी