शिंदे गटाला भाजपचा पहिला धक्का, मुख्यमंत्र्यांच्या जवळील 'त्या' तिघांच्या हाती भाजपचं कमळ

ठाणे
सुनिल देसले
Updated Jul 19, 2022 | 14:55 IST

Maharashtra politics news: एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या इतर आमदारांनी बंडखोरी केल्याने महाराष्ट्रात सत्तांतर झालं. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत मिळून सत्ता स्थापन केली मात्र, त्याच भाजपने शिंदे गटाला आता धक्का दिला आहे.

CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (फाईल फोटो) 
थोडं पण कामाचं
  • एकनाथ शिंदे गटाला भाजपला पहिला धक्का
  • एकनाथ शिंदे यांच्या जवळचे आणि मर्जीतल्या तिघांचा भाजपमध्ये प्रवेश
  • शिंदे गटाला भाजपने दिलेल्या धक्क्याने राजकीय चर्चांना उधाण

नवी मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीमुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला आणि त्यानंतर राज्यात सत्तांतर झालं. एकनाथ शिंदे गटाने भाजप (BJP)सोबत मिळून राज्यात सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री बनले आणि त्यांना मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढू लागला. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी, खासदार यांचा पाठिंबा मिळत आहे. मात्र, भाजपसोबत हातमिळवणी केलेल्या एकनाथ शिंदे गटाला आता भाजपने पहिला धक्का (big jolt for Shinde camp from BJP) दिला आहे.

भाजपचा शिंदे गटाला पहिला झटका

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री बनल्यानंतर शिंदे गटाला समर्थन देणाऱ्यांची संख्या वाढू लागली. ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, मीरा भाईंदर येथील नगरसेवकांनी जाहीरपणे शिंदे गटाला समर्थन दिलं. मात्र, त्याच दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या तीन माजी नगरसेवकांनी भाजपत प्रवेश केला आहे.

नवी मुंबईतील तीन माजी नगरसेवकांनी भाजपत प्रवेश (Navi Mumbai Municipal Corporation ex corporators join BJP) केला आहे. भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्या उपस्थितीत या तिन्ही नगरसेवकांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. नवी मुंबईतील माजी नगरसेवक नवीन गवते, अपर्णा गवते आणि दीपा गवते यांनी गणेश नाईक यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला आहे. ऐरोली-दिघा परिसरात गवते कुटुंबाचं बऱ्यापैकी वर्चस्व आहे. हे तिन्ही नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जातात.

हे पण वाचा : पुराच्या पाण्यात स्कूल बस गेली वाहून,LIVE VIDEO आला समोर

पुन्हा घरवापसी

काही दिवसांपूर्वी या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. २०२१ च्या दरम्यान नवी मुंबईतील भाजपच्या नगरसेवकांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाट धरली होती. पण आता तीन माजी नगरसेवकांनी पुन्हा एकदा गणेश नाईक यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला आहे. हे तिन्ही नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या जवळचे असल्याने भाजपच्या गळाला लागल्याने शिंदे गटासाठी हा एक मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे.

शिंदे गटासाठी धोक्याची घंटा? 

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर भाजपच्या मदतीने राज्यात सत्तास्थापन केली. मात्र, अद्यापही राज्यात पूर्ण मंत्रिमंडळ अस्तित्वात नाहीये. त्यातच आता एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जाणारे माजी नगरसेवक सुद्धा भाजपने आपल्या गळाला लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शिंदे गटासाठी ही एक धोक्याची घंटा तर नाहीये ना? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी