ठाणे : शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या ४० आमदारांनी समर्थन दिलं आणि त्यानंतर राज्यात सत्तांतर झालं. या सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे गटाला मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. शिवसेनेचे पदाधिकारी, प्रवक्ते, नगरसेवक असे एकामागूनएक एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होताना दिसून येत आहे. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर नंतर आता मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. कारण, मीरा भाईंदर मनपाचे १८ नगरसेवक आज शिंदे गटाला आपला पाठिंबा जाहीर करणार आहेत.
शिवसेनेचे बंडखोर आमदार प्रताप सरनाईक यांच्या सोबत मीरा भाईंदर महानगरपालिकेचे १८ नगरसेवक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हे सर्व नगरसेवक आपला पाठिंबा शिंदे गटाला जाहीर करणार आहेत.
#BREAKING | Under the leadership of Rebel MLA, Pratap Sarnaik, 18 Corporators from Mira Bhayander Municipal Corporation will join #EknathShinde Camp today. @awasthiabhi11 reports pic.twitter.com/gy80HNwIIT — Mirror Now (@MirrorNow) July 14, 2022
बुधवारी (१३ जुलै) उल्हासनगर महानगरपालिकेतील १५ नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाला आपला पाठिंबा दिला. एकनाथ शिंदे गटाला मिळत असलेला पाठिंबा हा शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी आगामी निवडणुकांपूर्वी मिळालेला एक मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.
हे पण वाचा : या दिवशी होणार शिंदे-फडणवीस सरकारचा विस्तार
एकनाथ शिंदे यांना आमदारांचाच नाही तर सर्वसामान्य शिवसैनिकांपासून तर खासदारांचाही पाठिंबा मिळताना दिसून येत आहे. राज्यात सत्तांतर झाल्यावर शिवसेनेच्या खासदारांनीही काही दिवसांपूर्वी थेट उद्धव ठाकरेंसमोर शिंदे यांच्यासोबत जुळवून घेण्याची मागणी केली होती.
इतकेच नाही तर आपला पूर्वीचा मित्रपक्ष असलेल्या भाजपसोबत पुन्हा जुळवून घ्या आणि युती करा अशी मागणीही शिवसेनेतील एका गटाकडून होताना दिसत आहे. या वाढत्या मागणीमुळे उद्धव ठाकरे यांच्यावरही युतीसाठी दबाव वाढताना दिसून येत आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांनी नुकताच राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराला आपला पाठिंबा दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी अधिकृतपणे एनडीएच्या उमेदवाराला दिलेला पाठिंबा हे पुन्हा शिवसेना-भाजप युतीचे संकेत आहेत का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.