खड्ड्याची तक्रार करा टोल फ्री नंबरवर; 48 तासात घेणार दखल

ठाणे
रोहित गोळे
Updated Jul 12, 2022 | 00:08 IST

कल्याण-डोंबिवली शहरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर खड्डे पडतात. त्यामुळे आता मुख्यमंत्री शिंदेंच्या आदेशानंतर प्रशासनाने खड्डे बुजविण्यासाठी थेट टोल फ्री नंबर सुरुच केला आहे.

call directly on toll free number for filling pits action to be taken in 48 hours
खड्ड्याची तक्रार करा टोल फ्री नंबरवर; 48 तासात घेणार दखल 
थोडं पण कामाचं
  • रस्त्यावर पडलेले खड्डे ४८ तासात बुजवले जाणार
  • खड्डे बुजविण्यासाठी केडीएमसीने सुरु केला टोल फ्री नंबर
  • मुख्यमंत्री शिंदेंच्या आदेशानंतर केडीएमसी लागली कामाला

कल्याण: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका नेहमीच खड्ड्यांमुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसात इथे पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे येथील अनेक रस्त्यांवर बरेच खड्डे पडले आहेत. त्यामळे पुन्हा एकदा रस्त्यांच्या कामाची पोलखोल झाली.वाढत्या खड्ड्यांची समस्या लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर पालिकेने 15 कोटीचा निधी देत 13 कंत्राटदारांमार्फत रस्त्यावरील खड्डे  बुजवण्याच्या कामाला सुरवात केली आहे. यासाठी चक्का टोल फ्री नंबर देखील सुरू करण्यात आला आहे. 

यावर फोन करून नागरिक आपली खड्ड्यांविषयी तक्रार करू शकतात. तसेच 48 तासांच्या आत या तक्रारीची दखल प्रशासनाकडून घेतली जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं  आहे. 

कल्याण, डोंबिवली, शहरातील सर्व प्रमुख रस्ते तसेच शहराच्या अंतर्गत रस्त्यांवर जीवघेणे खड्डे झाल्याने नागरिकांना प्रवास करणे कठीण झाले आहे. खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना सातत्याने घडत आहेत. तसेच अवघ्या काही मिनिटांचे अंतर कापण्यासाठी नागरिकांना तासन्तास लागत आहे.

अधिक वाचा: नाशकात मुसळधार पाऊस; गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

विशेष म्हणजे, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. तर सर्वच विभाग तसेच महापालिका प्रशासन सर्व काही जाणूनही याकडे दुर्लक्ष करत असल्याने प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे .या बाबत गेल्या सहा तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाइन मिटिंग घेत रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवण्याचे आदेश दिले. 

अधिक वाचा: भयंकर पूरस्थिती; शिंदे-फडणवीस एकत्र दौऱ्यावर

त्यानुसार केडीएमसी ॲक्शन मोडमध्ये आली असून केडीएमसी हद्दीतील सर्व प्रभागात 15  कोटीचा निधी देत 13 कंत्राटदारांमार्फत खडीकरण, जीएसबी आणि कोळमेंट्सद्वारे खड्डे बुजवण्याचे  काम सुरू केले असून वाढत्या खड्ड्यांची समस्या लक्षात घेता 02512201168 हा टोल फ्री नंबर सुरू करण्यात आला आहे. 

यावर फोन करून नागरिक आपली तक्रार करू शकतात. तसेच 48 तासांच्या आत या तक्रारीची दखल प्रशासनाकडून घेतली जाणार असल्याचे केडीएमसीच्या शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली यांनी सांगितलं. मात्र, जुलै महिन्यात सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडला असल्याने खड्डे भरायला अनेक अडचणी येत आहेत. पण जून महिन्यात म्हणावा तसा पाऊस पडला नाही पण त्यावेळी खड्डे बुजवले गेले नसल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी