मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे राज्यात आणि देशातील लॉकडाऊनचा कालावधी सुद्धा टप्प्याटप्प्याने वाढवला जात आहे. लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय, उद्योगधंदे, व्यापारावर बंदी घालण्यात आली आहे आणि याचा थेट परिणाम नागरिकांच्या बजेटवर होताना दिसत आहे. त्यामुळे सिडकोने याची दखल घेत नागरिकांना आपला हफ्ता भरण्यासाठी सवलत द्यावी अशी मागणी सिडको महानिर्माण योजनेतील सदनिका धारकांकडून होत आहे.
सिडकोने नवी मुंबईत आपल्या महागृहनिर्माण योजने अंतर्गत २ ऑक्टोबर २०१८ रोजी लॉटरी काढली होती. या लॉटरीतील विजेत्यांना सिडकोने वाटपपत्र दिले असून घराचा हफ्ता भरण्यासाठी सविस्तर शेड्युल जाहीर केलं. त्यानुसार आता शेवटचा हफ्ता हा ५ जून २०२० आहे आणि त्यासोबतच विजेत्यांना इतर चार्जेसची रक्कम सुद्धा भरायची आहे.
लॉकडाऊनमुळे सर्वच कंपन्या, उद्योगधंदे, व्यापर बंद आहेत. काहींना पगार मिळाला नाहीये, कुणाच्या वेतनात कपात झाली आहे तर कुणी नोकरी गमावली आहे. तसेच ही परिस्थिती किती दिवस राहील याचा अंदाजही वर्तण्यात येत नाहीये. अशा परिस्थितीत घर चालवणं देखील अडचणीच होऊन बसलं आहे. त्यामुळे सिडकोने याची दखल घ्यावी आणि सदनिकांच्या सहाव्या हफ्त्याचे पैसे भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी होत आहे.
सिडको सदनिका धारक ईमेल करुन सिडकोकडे सवलत देण्याची मागणी सुद्धा करत आहेत. अनेकांनी nivarahelpdesk@gmail.com, md@cidcoindia.com, jmd1@cidcoindia.com, jmd2@cidcoindia.com, cvo@cidcoindia.com, या ईमेल आयडीवर मेल करुन हफ्त्याची तारीख पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. त्यापैकी एक सिताराम पोयरेकर यांनी सुद्धा ईमेल केला आहे. तसेच इतर सदनिका धारकांनाही या ईमेल आयडीवर मेल करावा जेणेकरुन सिडकोने याकडे गांभीर्याने लक्ष देईल असं सिताराम पोयरेकर यांनी म्हटलं आहे.
यापूर्वी २१ एप्रिल २०२० रोजी सिडको सदनिका धारकांना आपल्या घराचा हफ्ता भरायचा होता. त्या काळातही लॉकडाऊन कायम होते. मात्र, सिडकोने कुठल्याही प्रकारची सवलत किंवा मुदवतवाढ जाहीर केली नाही. परिणामी ज्यांना शक्य झाले त्यांनी या हफ्त्याचे पैसे भरले मात्र, ज्यांना शक्य झाले नाही त्यांच्याकडून सिडको दंड आकारणार आहे.
लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करुन केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)ने सर्व बँकांना होम लोनवरील तीन महिन्यांचे हफ्ते स्थगित करण्याचे आदेश दिले होते आणि त्यानुसार बँकांनी होम लोन घेणाऱ्या ग्राहकांना सूटही दिली. आता त्याचपद्धतीने सिडकोने सुद्धा सर्वसामान्य नागरिकांचा विचार करुन काही प्रमाणात सवलत द्यावी आणि योग्य तो निर्णय घ्यावा अशी अपेक्षा सिडको सदनिका धारक करत आहेत.