CIDCO महागृहनिर्माण योजनेतील लाभार्थ्यांना घरांचा ताबा कधी? पाहा सिडकोने काय म्हटलं...

CIDCO Lottery: सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेतील विजेत्यांना आल्या घराचा ताबा कधी मिळणार असा प्रश्न वारंवार विचारण्यात येत होता. यावर आता सिडकोकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. 

cidco mega housing scheme lottery
CIDCO महागृहनिर्माण योजनेतील लाभार्थ्यांना घरांचा ताबा कधी? 

नवी मुंबई : सिडको(CIDCO)तर्फे नवी मुंबईत महागृहनिर्माण योजने अंतर्गत घरांची लॉटरी (CIDO mega housing scheme lottery) काढली होती. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे या योजनेतील विजेत्यांना घरांचा ताबा अद्याप मिळू शकलेला नाहीये. सिडकोतर्फे बांधण्यात येणाऱ्या पंतप्रधा आवास योजनेतील (PMAY) बांधकाम स्थळांना सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ संजय मुखर्जी (Dr. Sanjay Mukherjee) यांनी भेट देऊन बांधकामाचा आढावा घेतला. 

यावेळी डॉ. संजय मुखर्जी म्हणाले, सदर योजनेच्या पहिल्या टप्प्यातील घरांचा ताबा मार्च २०२१ अखेरीस देण्याचा मानस असल्याचे व नव्या वर्षात सिडकोच्या घरांची विक्री करण्याच्या योजनादेखील जाहिर करण्याचा सिडकोचा मानस आहे.

सिडकोतर्फे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत नवी मुंबईमध्ये साकारण्यात येत असलेल्या महागृहनिर्माण योजनेतील घरांच्या बांधकामाचे काम प्रगतीपथावर असून या योजनेमुळे नजीकच्या काळात अनेक कुटुंबांचे हक्काच्या घराचे आणि नवी मुंबईमध्ये वास्तव करण्याचे स्वप्न साकार होणार आहे अशी प्रतिक्रिया डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली आहे. 

सिडकोने नेहमीच अत्यंत किफायतशीर दरात घरांची विक्री केली आहे. त्यामुळे सदर महागृहनिर्माण योजनेच्या माध्यमातून सिडको पंतप्रधान आवास योजनेतील सर्वांसाठी घरे या उद्दिष्टपूर्तीसाठी मोठे योगदान देणार असल्याचे मतही उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांनी यावेळी व्यक्त केले. त्याचप्रमाणे हे गृहप्रकल्प परिवहन केंद्रीत आहेत त्यामुळे नागरिकांचा घर ते कामाचे स्थळ यामधील प्रवासाचा वेळ वाचणार आहे.

सिडकोने नवी मुंबईत आपल्या महागृहनिर्माण योजनेच्या अंतर्गत २ ऑक्टोबर २०१८ रोजी घरांची लॉटरी काढली होती. या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (पंतप्रधान आवास योजना) आणि अल्प उत्पन्न गट याकरिता नवी मुंबईतील अकरा ठिकाणी एकूण १४,८३८ घरे उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. या योजनेची संगणकीय सोडत २ ऑक्टोबर २०१८ रोजी काढण्यात आली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी