[VIDEO] 'महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडलं असेल', पाहा फडणवीस असं का म्हणाले! 

ठाणे
रोहित गोळे
Updated Dec 26, 2019 | 13:14 IST

Devendra Fadnavis Criticize राज्यात नवं सरकार स्थापन झालेलं असलं तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. त्यावरुनच आता सरकारवर टीका केली जात आहे.

devendra fadnavis criticize to thackeray govt on cabinate expansion 
महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडलं असेल: फडणवीस  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • देवेंद्र फडणवीसांची पुन्हा एकदा सरकारवर टीका
  • जनतेने सत्ता दिली तरी मंत्रिमंडळाचा विस्तार करु शकले नाही: फडणवीस
  • फडणवीसांनी केलेल्या टीकेला शिवसेना उत्तर देणार?

कल्याण: राज्यात नवं सरकार स्थापन होऊन आता जवळपास महिना होत आलेला असतानाही अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आलेला आहे. पण आता यावरुन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर जबरदस्त टीका केली आहे. 'जनतेने राज्य दिलेलं असताना आता मंत्रिमंडळाचा विस्तार तरी या सरकारने करावा.' अशी बोचरी टीका फडणवीसांनी केली आहे. ते बदलापूरमध्ये बोलत होते. 

कल्याण तालुक्यातील बदलापूर येथे अटल संध्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. याच कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते असं म्हणाले की, 'विरोधीभासाने तयार झालेलं हे सरकार चालविण्याची कसरत ही आता मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना करावी लागेल. मला वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा असं होत असेल. इतके दिवस झाले तरी मंत्रिमंडळाचा ठिकाणा नाही. मला वाटतं जनतेने यांना राज्य दिलंय तर किमान मंत्रिमंडळाचा विस्तार तरी यांनी करावा आणि राज्य नीट चालवावं.' असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर टीका केली आहे. 

२८ नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांच्यासह शिवसेनचे नेते एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील आणि छगन भुजबळ आणि काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली होती. पण त्यानंतर अद्यापही मंत्रिमंडळाचा संपूर्ण विस्तार झालेला नाही. 

दरम्यान, येत्या सोमवारी (३० डिसेंबर) ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. यावेळी अनेक आमदार हे मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसला गृह मंत्रालय देण्यास तयार झालेलं आहे. पण हे अत्यंत महत्त्वाचं मंत्रालय राष्ट्रवादी काँग्रेस जयंत पाटील यांना देणार की, अजित पवार यांना याबाबत अद्याप नेमकी माहिती समजू शकलेली नाही. सध्या गृह खात्याच्या कारभार हा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. 

आतापर्यंत मुख्यमंत्र्यांसह एकूण सात जणांनी शपथ घेतली आहे. अद्यापही मंत्रिमंडळात एकूण ३६ जणांचा समावेश करता येऊ शकतो. ज्यामध्ये २८ कॅबिनेट आणि ८ राज्य मंत्रिपदांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसने अद्याप आपल्या मंत्र्यांची नावं निश्चित केलेली नाही. पण दुसरीकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या याद्या मात्र तयार आहेत. त्यामुळे आता नव्या मंत्र्यांचा  शपथविधी सोहळा कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी