कर्ज फेडण्यासाठी ICICI बँकेवर टाकलेला दरोडा

ठाणे
रोहन जुवेकर
Updated Jul 31, 2021 | 12:08 IST

सुमारे एक कोटी रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी अनिल दुबेने चाकूचा धाक दाखवून बँक लुटण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्याने बँकेतील एका महिला अधिकाऱ्याची हत्या केली. दुबेला ६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.

Ex staffer of ICICI Bank killed bank staffer for robbery, send to police custody till 6 aug
कर्ज फेडण्यासाठी ICICI बँकेवर टाकलेला दरोडा 
थोडं पण कामाचं
  • कर्ज फेडण्यासाठी ICICI बँकेवर टाकलेला दरोडा
  • बँकेतील एका महिला अधिकाऱ्याची हत्या केली
  • आरोपी अनिल दुबेला ६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

विरार: आयसीआयसीआय बँकेचा माजी मॅनेजर अनिल दुबे याला शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीत मोठा तोटा झाला. आर्थिक नियोजन चुकल्यामुळे डोक्यावर एक कोटी रुपयांचा कर्जभार आला. हे कर्ज चुकवणे अशक्य असल्याची जाणीव झाल्यावर झटपट पैसे कमवून सर्व आर्थिक प्रश्न चुटकीसरशी सोडविण्यासाठी अनिल दुबेने चाकूचा धाक दाखवून बँक लुटण्याचा निर्णय घेतला. Ex staffer of ICICI Bank killed bank staffer for robbery, send to police custody till 6 aug

ठरल्याप्रमाणे अनिल दुबे पालघर जिल्ह्यातील विरार पूर्वेच्या मनवेल पाडा येथील आयसीआयसीआय बँकेच्या शाखेत दाखल झाला. दुबे आला त्यावेळी (गुरुवार २९ जुलै २०२१) रात्रीचे आठ वाजले होते. बँक बंद झाली होती. दिवसभराचे कामकाज संपल्यानंतर कॅश मोजून लॉक करुन ठेवण्याचे काम सुरू होते. बँकेत फक्त मॅनेजर आणि कॅशियर एवढेच उपस्थित होते. इतर मंडळी घरी गेली होती. याचवेळी दुबेने चाकुचा धाक दाखवत बँकेतील रोख रक्कम आणि दागिने लुटण्याचा प्रयत्न केला. 

बँकेतील पैसे आणि सोने लुटण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पाहून बँक मॅनेजर योगिता वर्तक (३४) आणि कॅशियर श्वेता देवरूखकर (३२) यांनी विरोध सुरू केला. दोघींनी मदतीसाठी आरडाओरडा केला. विरोध होत असल्याचे पाहून दुबेने चाकूचे वार केले. यात बँक मॅनेजर योगिता वर्तक यांचा मृत्यू झाला आणि कॅशियर श्वेता देवरूखकर गंभीर जखमी झाल्या.

आवाज ऐकून स्थानिकांनी पोलिसांना कळवले. विरार पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी गंभीर जखमी झालेल्या श्वेता देवरूख यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तर सोने आणि पैशाची बॅग घेऊन पळून जात असलेल्या दुबेला स्थानिकांनी पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. 

अनिल दुबेकडून पोलिसांनी सोने आणि रोख रक्कम असा सव्वादोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आतापर्यंत झालेल्या तपासाची माहिती आणि जप्त केलेला मुद्देमाल सादर करत पोलिसांनी अनिल दुबेला कोर्टात हजर केले. कोर्टाने अनिल दुबेला ६ ऑगस्ट २०२१ पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. दरोडा प्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी