राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल: ठाण्यातील उत्तर सभेमध्ये तलवार दाखवणं महागात पडलं

ठाणे
भरत जाधव
Updated Apr 13, 2022 | 13:52 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये राज ठाकरेंसोबत आणखी दोन कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 case against Raj Thackeray
राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • राज ठाकरे महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात सक्रिय आहेत.
  • ठाण्यातील नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये राज ठाकरेंसोबत आणखी दोन कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये राज ठाकरेंसोबत आणखी दोन कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान ते अलीकडच्या काळात महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात सक्रिय आहेत. ठाण्यातील सभेत समर्थकांसह त्यांनी तलवार दाखवत हवेत फिरवली होती. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात कालच झालेल्या ठाणे येथील उत्तर सभेत त्यांनी भाषण केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी सभेत मशीदींवरील भोंगे काढण्यासाठी राज्य सरकारला ईदपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. यासोबतच, सभेत तलवारसुद्धा दाखवली होती. त्यावरुनच पोलिसांनी हा गुन्हा दाखल केल्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, एएनआय या वृत्तसंस्थेने राज्याच्या गृहविभागाकडून आर्म्स अ‍ॅक्ट अंतर्गत राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे सांगितले आहे. यासोबतच मनसेचे अविनाश जाधव आणि नरेंद्र जाधव यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शिवसेना मुख्यालय आणि हनुमान चालीसा 

रामनवमीच्या दिवशी शिवसेना पक्ष मुख्यालय 'शिवसेना भवन' बाहेर लाऊडस्पीकरवर 'हनुमान चालीसा' वाजवण्यात आली. मात्र काही वेळाने पोलिसांनी ते थांबवले.  गेल्या आठवड्यात मुंबईतील गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे मशिदींवरील लाऊडस्पीकर काढण्याविषयी विधान केलं होतं. जर भोंगे उतरवले नाहीतर आपण त्या समोर हनुमान चालिसा पठण लावू असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता.  त्यानंतर राम नवमीला मनसे कार्यकर्त्यांनी शिवसेना भवन समोर हनुमान चालिसा लावली होती. राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला मशिदींद्वारे वापरले जाणारे लाऊडस्पीकर बंद करण्यास सांगितले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी