तुम्हाला माहितेय कल्याणमध्ये दरवर्षी म्हशी उड्डाणपुलावर दावणीला का बांधतात?

ठाणे
रोहित गोळे
Updated Jul 13, 2022 | 23:26 IST

कल्याणमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे येथील दूधनाका परिसरातील हजारो म्हशी या गोविंदवाडी बायपास उड्डाणपुलावर बांधण्यात आल्या आहेत.

flood situation in kalyan bay area milk businessmen brought thousands of buffaloes to flyover and tied them
तुम्हाला माहितेय कल्याणमध्ये दरवर्षी म्हशी उड्डाणपुलावर दावणीला का बांधतात? 
थोडं पण कामाचं
  • कल्याण खाडी परिसर पाण्याखाली; हजारो म्हशी रस्त्यावर
  • कल्याण-डोंबिवली परिसरात तुफान पाऊस
  • पावसामुळे दूधनाका आणि खाडी परिसरात पूर

कल्याण: गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने कल्याण डोंबिवलीमध्ये आता चांगलाच जोर पकडला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर मुंबईच्या नजीक असलेल्या कल्याण-डोंबिवलीत देखील तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.  

सतत सुरु असलेल्या पावसामुळे खाडीच्या पाण्यात वाढ झाली असून कल्याण पश्चिमेतील दूधनाका आणि परिसर संपूर्ण पाण्याखाली गेला आहे. तेथील घरे आणि म्हशींच्या तबेल्यांमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे दूध व्यावसायिकांनी आपल्या सर्व म्हशी या गोविंदवाडी बायपास उड्डाणपुलावर आणून बांधल्या आहेत. 

यामुळे हजारो म्हशींनी हा रस्ता दोन्ही बाजूने भरल्यामुळे हा बायपास की म्हशींचा तबेला? अशी स्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारी रात्रीपासून कल्याण डोंबिवलीत पावसाने जोर धरला आहे. संध्याकाळी पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. मुसळधार पावसामुळे कल्याणच्या खाडी पात्रातील पाण्याची पातळी वाढली आहे. याचा परिणाम म्हणजे खाडीमधील पाणी हे रेतीबंदर परीसरातील तबेले आणि चाळींमध्ये शिरले आहे. त्यामुळे तबेल्यातील म्हशी  गोविंदवाडी बायपासवर बांधण्यात आल्या.

अधिक वाचा: अतिवृष्टी इशारा:3 जिल्ह्यांना रेड,12 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

दरम्यान, प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेत आसपासची अनेक घरं रिकामी करुन घेतली आहेत. पावसामुळे उल्हास नदी तसेच डोंबिवली पश्चिमेकडील खाडी पात्राची पाण्याची पातळी वाढली आहे. इतकंच नाही तर टिटवाळा नजीक असलेला रुंदे पूलही पाण्याखाली गेला आहे.

...म्हणून म्हशी उड्डाणपुलावर बांधतात

दर पावसाळ्यात कल्याणच्या दूधनाका परिसरातील गोविंदवाडी बायपास उड्डाणपुलावरुन जाताना आपल्याला हजारो म्हशी रस्त्यावर दावणीला बांधलेल्या दिसून येतात. अनेकांना असा प्रश्न पडतो की, म्हशी उड्डाणपुलावर आणून का बांधतात?

याचं नेमकं कारण समजून घ्यायचं असेल तर आपल्याला थोडं मागे म्हणजे २००५ सालापर्यंत जावं लागेल. २६ जुलै २००५ रोजी मुंबईसह उपनगरात भयंकर पूर आला होता. याच पुराने संपूर्ण  कल्याण पाण्याखाली गेलं होतं. 

कल्याण खाडी परिसरात तर २० फुटांहून अधिक पाणी शिरलं होतं. या परिसरात दूध व्यवसाय असल्याने मोठ्या प्रमाणात म्हशींचे तबेले आहेत. जिथे हजारो म्हशी आहेत. २६ जुलैला रात्री अचानक पुराचं पाणी मोठ्या प्रमाणात या भागात शिरलं. पाण्याचा वेग एवढा तुफान होता की, काही कळायच्या आतच नागरी वस्ती पूर्णपणे पाण्याखाली गेली. 

अधिक वाचा: कडक सॅल्यूट! स्वत:चा जीव धोक्यात घालून वासराला दिले जीवनदान

यावेळी दूधनाका परिसरातील तबेल्यांमध्ये हजारो म्हशी दावणीला बांधलेल्या होत्या. अवघ्या काही मिनिटांमध्ये येथील तबेले पाण्याखाली गेले आणि येथील हजारो म्हशींचा पुराच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ज्यामुळे येथील दूध व्यावसायिकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं.

तेव्हापासूनच जेव्हा-जेव्हा खाडी परिसरात पुराची स्थिती निर्माण होईल असं वाटू लागतं तेव्हा-तेव्हा येथील दूध व्यावसायिक खबरदारीचा उपाय म्हणून पावसाळ्यात आपल्या म्हशी या उड्डाणपुलावर आणून बांधतात.  

कल्याण-डोंबिवलीत तुफान पाऊस

कल्याणच्या शहरी भागासह अनेक ग्रामीण भागातही पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. कल्याणमध्ये दुर्गाडी खाडीचे पाणी वाढले असून ते गणेश घाटाच्या रेलिंगला लागलं आहे. यामुळे कोळी बांधवांनी आपल्या बोटी किनाऱ्यावर आणून ठेवल्या आहेत. या सगळ्या पूरस्थितीमुळे कल्याणकरांची मात्र चिंता वाढली आहे. 

अधिक वाचा: धक्कादायक... सांगलीमधील कुटुंब ओमानच्या समुद्रात बुडालं

जर पावसाचा जोर कायम राहिल्यास कल्याणमध्ये पुराची भयंकर स्थिती उद्भवू शकते. त्यामुळे कल्याणमधील प्रशासन आधीच सतर्क झालं असून त्यासंबंधी उपाययोजना देखील करण्यात आल्या आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी