Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पाऊस; खांदेश्वर रेल्वे स्थानकात शिरले पाणी, प्रवाशांची तारांबळ

ठाणे
सुनिल देसले
Updated Jul 04, 2022 | 22:12 IST

Mumbai Rain updates: मुंबई आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे नवी मुंबईतील खांदेश्वर रेल्वे स्थानकात पाणी शिरल्याचं पहायला मिळालं.

Heavy rainfall in mumbai and suburban area water enters in khandeshwar railway station see photos
Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पाऊस; खांदेश्वर रेल्वे स्थानकात शिरले पाणी, प्रवाशांची तारांबळ  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • मुंबईसह संपूर्ण कोकणात जोरदार पाऊस
  • महाड तालुका पोलीस स्टेशन हद्दीत रेवतळे गावाजवळील पूलावरुन पाणी जात असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद 
  • जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली, सध्या 7.20 मीटर उंचीने पाण्याचा प्रवाह आहे. पाण्याखाली जाणाऱ्या भागातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे आदेश देण्यात आले 

नवी मुंबई : मुंबईसह संपूर्ण कोकणात जोरदार पाऊस (Heavy rainfall in Konkan) पडत आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईतील अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. मुंबईला लागून असलेल्या नवी मुंबईतील खांदेश्वर रेल्वे स्थानकात पाणी शिरले आहे. नवी मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकात जाण्याचा मार्ग भूमिगत आहे. खांदेश्वर रेल्वे स्थानकात पाणी शिरल्याने आता हे पाणी बाहेर काढण्यासाठी थोडा वेळ लागण्याची शक्यता आहे तसेच पावसाचा जोरही कायम असल्याचं पहायला मिळत आहे. रेल्वे स्थानकात शिरलेले पाणी बाहेर काढण्यासाठी तेथे पंपही लावण्यात आले आहेत. (Rain water enters in Khandeshwar Railway Station)

संध्याकाळपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. संध्याकाळी सर्व ऑफिस सुटल्याने नागरिक घरी परतण्यासाठी बस किंवा ट्रेनचा वापर करतात. मात्र, मुसळधार पावसाचा परिणाम लोकल ट्रेनवरही झाल्याचं पहायला मिळत आहे. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने लोकल सेवेवरही परिणाम झाला आहे.

जगबुडी नदीने ओलांडली धोक्याची पातळी

रत्नागिरीतही मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली आहे. सध्या 7.20 मीटर उंचीने पाण्याचा प्रवाह सुरू आहे. पाण्याचा प्रवाह पाहता नदी शेजारील ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हवलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हे पण वाचा : मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळली; 75 नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर

जगबुडी, काजळी नदीचे पाणी इशारा पातळीवरुन वाहत असल्याने या भागातील नागरिकांना वेळीच सूचना देणे, प्रसंगी त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे तसेच जीवितहानी होऊ देऊ नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तसेच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत.

राजापूरला पुराचा वेढा

रत्नागिरी जिल्ह्याला सकाळपासून पावसानं झोडपून काढलं आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. राजापूरच्या अर्जुना आणि कोदवली नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे राजापूर शहरात पाणी शिरले आहे. शहरातील जवाहर चौक व बाजारपेठेत पाणी भरल्यानं व्यापार्‍याची तारांबळ उडाली.

हे पण वाचा : पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचे; कुठे ऑरेंज अलर्ट अन् कुठे Yellow Alert? वाचा

राजापूर जवाहर चौकात पाणी शिरले आहे तर बाजारपेठेत बहुतांश ठिकाणी पाणी शिरले. कोदावली आणि अर्जुना नदीनं पात्र सोडल्यानं पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी