Murder and surrender | आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत पाहिल्यानंतर संतापाचा भडका उडालेल्या एका पतीने तिची निर्घृण हत्या केल्याची घटना भिवंडीत घडली आहे. पत्नीचा खून करून हा पती थेट पोलीस ठाण्यात पोहोचला आणि घडलेली हकीकत पोलिसांना सांगितली. ते पाहून क्षणभर पोलिसही चक्रावून गेले आणि खुनी पतीला त्यांनी अटक केली. आपल्या पत्नीचा आपण खून केला असून तिचा मृतदेह घरातच पडला आहे, असं त्यानं पोलिसांना सांगितलं.
मूळच्या उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यात राहणाऱ्या मोहम्मद मुश्ताकचा विवाह आबिदा खातून नावाच्या महिलेशी 15 वर्षांपूर्वी झाला होता. या जोडप्याला पाच मुलं होती. हे कुटूंब भिवंडीतील एका घरात राहत होतं. गेल्या काही वर्षांपासून आपल्या पत्नीने परपुरुषाशी संबंध असल्याचा संशय मोहम्मदला होता. त्यासाठी त्याने अनेकदा तिच्यावर पाळत ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कधीही त्याला ठोस पुरावे मिळाले नव्हते. आपण घेत असलेली शंका व्यर्थ असल्याचंही त्याला वाटत होतं. मात्र अनेकदा तिचं वागणं संशयास्पद वाटल्यामुळे तो पुन्हा आपला शोध सुरू करत असे. कित्येक महिने शंकेची पाल त्याच्या मनात चुकचुकत होती.
अधिक वाचा - सांगली जिल्ह्यात हादरला, एकाच कुटुंबातील 9 जणांनी विष प्राशन करून सामूहिक आत्महत्या
घटनेच्या दिवशी मोहम्मदने त्याच्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं. पत्नी आणि तिचा प्रियकर यांना तशा अवस्थेत पाहून त्याचा स्वतःच्या रागावर ताबा राहिला नाही. त्यानं शेजारीच पडलेल्या तारेने पत्नीचा गळा आवळला. रागाच्या भरात त्याने आपल्या पत्नीची हत्या केली. तिचे प्राण गेल्याची खात्री पटल्यावर तो तसाच घराबाहेर पडला आणि त्याने थेट पोलीस स्टेशन गाठलं. आपण आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत रंगेहाथ पकडल्यामुळे रागाच्या भरात पत्नीची हत्या केल्याचं त्याने पोलिसांनी सांगितलं. त्याने सांगितलेली कहाणी ऐकून आणि त्याची अवस्था पाहून काही क्षण पोलीसही चक्रावून गेले. त्यांनी तातडीने मोहम्मदला अटक केली आणि त्याच्या घराकडे धाव घेतली. घरात त्याच्या पत्नीचा मृतदेह पडलेला होता आणि तिचा प्रियकर तिथून पळून गेला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तो पोस्टमॉर्टेमसाठी पाठवून दिला आहे. रिपोर्ट आल्यानंतर पत्नीच्या मृत्यूबाबत अधिक सविस्तर माहिती समोर येऊ शकेल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
अधिक वाचा - वैदर्भीय भाषेत गणीत शिकविणाऱ्या व्हायरल गुरूजी नितेश कराळे यांचा अग्नीपथ योजनेला विरोध
या घटनेनंतर परिसरात दहशत पसरली आहे. विवाहबाह्य संबंधांमुळे पत्नीची हत्या कऱणाऱ्या मोहम्मदवर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.