First Omicron case in Maharashtra डोंबिवली: कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत कोरोना विषाणूचा नवा अवतार असलेल्या ओमायक्रॉनने बाधीत झालेला एक रुग्ण आढळला. हा ओमायक्रॉनबाधीत असा महाराष्ट्रातील पहिला आणि भारतातील चौथा रुग्ण आहे. रुग्णाचे वय ३३ वर्षे एवढे आहे. त्याने अद्याप कोरोना प्रतिबंधक लसचा एकही डोस घेतलेला नाही.
ओमायक्रॉनची बाधा झालेला तरुण दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथून दुबई आणि दिल्ली मार्गे मुंबईत आला. तरुणाला २४ नोव्हेंबर २०२१ रोजी सौम्य ताप आला. अद्याप या तरुणात इतर कोणीतीही लक्षणे आढळली नाही. तरुणावर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. हा तरुण मर्चंट नेव्हीमध्ये मरिन इंजिनिअर म्हणून कार्यारत आहे.
रुग्णाच्या संपर्कात आलेल्या बारा अति जोखमीच्या सदस्यांच्या तसेच २३ कमी जोखमीच्या सदस्यांच्या कोरोना चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. तरुणाने दिल्ली-मुंबई हा प्रवास ज्या विमानाने केला त्या विमानातील २५ सहप्रशांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. या सर्व चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत.
कर्नाटकमध्ये दोन, गुजरातमध्ये एक आणि महाराष्ट्रात एक असे भारतात आतापर्यंत ओमायक्रॉनबाधीत चार रुग्ण आढळले आहेत.
झांबिया या देशातून पुण्यात आलेल्या एका ६० वर्षीय पुरुषाच्या जनुकीय तपासणीचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिला आहे. या अहवालानुसार, संबंधित व्यक्तीला ओमायक्रॉनची बाध झालेली नाही. पण त्याला डेल्टा सबलिनिएज विषाणूची बाधा झाली आहे.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरू असलेल्या कोरोना चाचण्यांमध्ये एक डिसेंबर पासून आतापर्यंत आठ कोरोनाबाधीत आढळले आहेत. त्यांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविले आहेत. महाराष्ट्रात १ नोव्हेंबरपासून परदेशातून आलेल्यांचे क्षेत्रीय पातळीवर सर्वेक्षण सुरू आहे.
विषाणूत बदल होणे ही नैसर्गिक बाब आहे. यामुळे घाबरून जाण्याऐवजी पात्र नागरिकांनी नियमानुसार कोरोना प्रतिबंधक लसीकरण करुन घ्यावे तसेच सर्वांनी कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे; असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने केले आहे.
आतापर्यंतच्या संशोधनानुसार, ज्यांना ओमायक्रॉनची बाधा झाली त्यांच्यात आढळलेली कोरोनाची लक्षणे सौम्य स्वरुपाची आहेत. यामुळे ओमायक्रॉनचा संसर्ग वेगाने पसरत असला तरी तो धोकादायक नाही, असा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे. पण हा अगदी प्रारंभीचा निष्कर्ष आहे. तज्ज्ञ या विषाणूबाबतची आणखी संशोधन करत आहेत. महिन्याभरात आणखी नेमकेपणाने याबाबतची माहिती हाती येईल. ओमायक्रॉन बाबत आणखी माहिती हाती येईपर्यंत लसीकरणाचा वेग वाढवणे, मास्क घालणे, हात धुणे, स्वच्छता राखणे, सोशल डिस्टंस राखणे, कोविड प्रोटोकॉलचे पालन करणे हेच नागरिकांना शक्य आहे.