Cyrus Mistry Death: उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू

ठाणे
रोहित गोळे
Updated Sep 04, 2022 | 18:00 IST

Cyrus Mistry: उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा आज (4 सप्टेंबर) पालघर जिल्ह्यातील चारोटी येथे एका भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. पालघर जिल्हा अधिकक्षकांनी या अपघाताची आणि सायरस मिस्त्री यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

industrialist cyrus mistry died in a tragic accident near palghar
उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा दुर्दैवी मृत्यू (फोटो: नवभारत टाइम्स) 
थोडं पण कामाचं
  • टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा दुर्दैवी मृत्यू
  • पालघरमधील सूर्या पुलावर डिव्हायडरला धडक दिल्याने झाला भीषण अपघात
  • अपघातात सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू

Cyrus Mistry Passes Away: पालघर: देशातील सर्वात बड्या उद्योजकांपैकी एक अशी ओळख असलेल्या सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचा एका भीषण अपघातात (Accident) दुर्दैवीरित्या मृत्यू (Death) झाल्याचं धक्कादायक वृत्त नुकतंच हाती आलं आहे. पालघर (Palghar) जिल्ह्यातील चारोटी या ठिकाणी त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. ज्यामध्ये त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. सायरस मिस्त्री यांची मर्सिडिज गाडी डिव्हायडरला धडकल्याने हा भीषण अपघात झाला. ज्यामध्ये सायरस मिस्त्री यांचं निधन झालं असल्याचं समजतं आहे. या अपघातात सायरस मिस्त्री यांचा ड्रायव्हर देखील गंभीर जखमी झाला आहे. मुंबई-अहमदाबाद मार्गावरील सूर्या नदीच्या पुलावर हा अपघात झाल्याचं समजतं आहे. (industrialist cyrus mistry died in a tragic accident near palghar)

मिळालेल्या माहितीनुसार, सायरस मिस्त्री हे अहमदाबादहून मुंबईच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला. जेव्हा कारला अपघात झाला त्यावेळी कारमध्ये एकूण 4 जण होते. त्यापैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये सायरस मिस्त्री यांचा समावेश आहे. तर दोन जण हे गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अधिक वाचा: सुसाट वेगाने केला घात, मेटेंच्या कार अपघाताचे एक कारण समजले

पालघर पोलीस अधिक्षकांनी दिली अपघाताची माहिती
                    
'आज दुपारी सव्वा तीन वाजेच्या दरम्यान अहमदाबादहून मुंबईला जाणाऱ्या रस्त्यावर सूर्या नदीच्या पुलावर हा अपघात झाला आहे. त्यामध्ये जे दोन जण जखमी आहेत त्यांना सुरुवातीला कासा येथील स्थानिक रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र आता त्यांना गुजरातील खासगी रुग्णालयात घेऊन जाण्यात येत आहे. इतर दोन लोकं हे मयत आहेत. हा अपघात मर्सिडिज गाडीचा झाला असून त्याचा नंबर MH 47-AB- 6705 असा आहे. आता या अपघाताबाबत आता स्थानिक पोलीस अधिक तपास करत आहेत.'

अधिक वाचा:  Vinayak Mete: विनायक मेटेंसोबत घात की अपघात?, भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले...

'हा अपघात गाडी डिव्हायडरला धडकल्याने झाला आहे. या अपघातात जे ड्रायव्हर आहेत ते जखमी आहेत. त्यामुळे नेमका अपघात कसा झाला हे थोड्या वेळाने ड्रायव्हरकडूनच समजू शकेल. प्राथमिकदृष्ट्या हा अपघात असल्याचं वाटत आहे. मात्र, तरीही पोलीस याबाबत सखोल तपास करुन याबाबतचा नेमका अहवाल तयार करतील.' अशी माहिती पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.

अधिक वाचा: Vinayak Mete: विनायक मेटे अपघाती मृत्यू प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल, CID चौकशीचे दिले आदेश

मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केलं दु:ख 

"टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला.  सायरस मिस्त्री हे केवळ एक यशस्वी उद्योजक नव्हते, तर उद्योग विश्वातील एक तरुण, उमदे आणि भविष्यवेधी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. सायरस मिस्त्री यांच्या निधनाने एक कर्तबगार उद्योजक आपल्यातून गेला आहे,  ही केवळ मिस्त्री कुटुंबीयांची नव्हे तर देशातील उद्योग विश्वाची मोठी हानी आहे.' या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सायरस मिस्त्री यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

सायरस मिस्त्रींचा अल्प परिचय

सायरस मिस्त्री हे प्रसिद्ध उद्योगपती पालोनजी मिस्त्री यांचे पुत्र होते. सायरस मिस्त्री यांचा जन्म 4 जुलै 1968 रोजी मुंबईत झाला होता. सायरस हे उच्चशिक्षित होते. त्यांनी लंडनच्या इम्पिरिअल महाविद्यालयातून आपलं पदवीचं शिक्षण घेतलं होतं. तर लंडनच्या बिझनेस स्कूलमधून त्यांनी व्यवस्थापन शास्त्रात पदव्युत्तर शिक्षणही घेतलं होतं.

अधिक वाचा: खळबळजनक! 5 तासांत 4 जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर कोसळला दु:खाचा डोंगर

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सायरस हे 1991 साली वडिलांच्या कंपनीमध्ये सहभागी झाले. त्यानंतर त्यांना तीन वर्षांमध्ये व्यवस्थापकीय संचालकपद देण्यात आलं होतं. सायरस मिस्त्री हे 2006 साली टाटा समूहात रुजू झाले होते. त्यानंतर सायरस मिस्त्री यांना त्यांच्या वयाच्या अवघ्या 42 व्या वर्षी टाटा समूहाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. 

2012 ते ऑक्टोबर 2016 पर्यंत ते टाटा समूहाच्या अध्यक्षपदी कायम होते. मात्र, यादरम्यान, टाटाचं संचालक मंडळ आणि सायरस मिस्त्री यांच्यात अनेकदा खटके उडाल्याचं समोर आलं होतं. तसेच 2016 साली सायरस यांची समाधानकारक कामगिरी नसल्याचं कारण देत त्यांना अध्यक्षपदावरुन हटवण्यात आलं होतं. या सगळ्या काळात रतन टाटा आणि सायरस मिस्त्री यांच्यात मतभेदही दिसून आले होते. 

अधिक वाचा: Nashik Malegaon: स्विमिंग पूलमध्ये पोहताना आला Heart Attack; 19 वर्षीय युवकाचा मृत्यू

मिस्त्री यांना अध्यक्षपदावरुन हटविण्यात आल्यानंतर त्यांनी टाटा समूहविरोधात काही आर्थिक बाबींवरुन थेट कोर्टातही धाव घेतली होती. मात्र, मागील काही काळात हे वाद संपुष्टात आल्याचं पाहायला मिळालं होतं.

दरम्यान, आज (4 सप्टेंबर) मुंबई-अहमदाबाद महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी