Bhagat Singh Koshyari: मला शिव्या घालाव्याशा वाटतात, इतका नालायक माणूस राज्यपाल आहे हे महाराष्ट्राचं दुर्दैव: जितेंद्र आव्हाड

ठाणे
रोहित गोळे
Updated Jul 30, 2022 | 17:38 IST

Jitendra Awhads tongue slips while criticizing Bhagat Singh Koshyari: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांची जीभ घसरली आहे. पाहा आव्हाड नेमकं काय म्हणाले.

unfortunate for maharashtra such a worthless person is governor jitendra awhad tongue slips criticizing bhagat singh koshyari
इतका नालायक माणूस राज्यपाल हे महाराष्ट्राचं दुर्दैव: आव्हाड 
थोडं पण कामाचं
  • राज्यपालांवर टीका करताना जितेंद्र आव्हाडांची जीभ घसरली
  • राज्यपाल कोश्यारीेना शिव्या द्याव्याशा वाटतात. आव्हाडांचं वक्तव्य
  • राज्यपाल कोश्यारींवर जितेंद्र आव्हाडांची जहरी टीका

Jitendra Awhad: ठाणे: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुंबईबाबत (Mumbai) केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्याविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात आता संतापाची लाट उसळली आहे. यावेळी राज्यपाल कोश्यारींवर टीका करताना माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांची जीभ मात्र घसरली आहे. (it is unfortunate for maharashtra that such a worthless person is governor jitendra awhads tongue slips while criticizing bhagat singh koshyari)

'इतका नालायक माणूस राज्यपाल म्हणून आहे हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. घटनात्मक भाषेत राज्यपालांना महामहिम म्हटलं जातं. पण आता ती त्यांची औकात राहिलेली नाही. ही व्यक्ती महाराष्ट्राचा राज्यपाल राहण्याच्या लायकीचा नाही. यांना हाकलून द्या.' अशी जहरी टीका जितेंद्र आव्हाड यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर केली आहे.

जितेंद्र आव्हाडांची राज्यपाल कोश्यारींवर घणाघाती टीका

  • 'इतका नालायक माणूस राज्यपाल म्हणून आहे हे महाराष्ट्राचं दुर्दैव'

'महात्मा फुलेंबद्दल ते जे काही बोलले ते इतकं घृणास्पद आणि घाणेरडं होतं की, त्याबद्दलच बोलणंच मी टाळलं. म्हणजे अक्षरश: मला तर माझ्या भाषेतील शिव्या घालाव्याशा वाटतायेत ज्या मी सार्वजनिकरित्या देऊ शकत नाही. पण इतका नालायक माणूस राज्यपाल म्हणून आहे हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. मराठी माणूस उपाशी राहील एकवेळ दोन घास कमी खाईल पण आपली अस्मिता गहाण ठेवणार नाही.' अशी संतप्त प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. पण आता त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे त्यांच्यावर देखील टीका होण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा: 'राज्यपाल कोश्यारी अजगरासारखे सुस्त पडलेले असतात...'

'जोपर्यंत ते राजकीय बोलत होते तोपर्यंत मी कधीही त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. कारण की, ते आपल्या पदाचा वारंवार गैरवापर करत होते. घटनात्मकदृष्ट्या त्यांचं वागणं हे घटनात्मक नव्हतं. पण राजकारणात असा वापर केला जातो. पण आता ते जे काही बोलले आहेत तो मराठी माणसाचा, मराठी मातीचा अपमान आहे. त्याला माफी नाही.'

  • 'महामहिम म्हणण्याची यांची औकात राहिलेली नाही' 

'घटनात्मक भाषेत राज्यपालांना महामहिम म्हटलं जातं. पण आता ती त्यांची औकात राहिलेली नाही. आपल्याला गुजराती आणि राजस्थानींबाबत एवढंच प्रेम आहे ना.. मग ही लोकं महाराष्ट्रात का आली पैसा कमवायला. त्यांनी गुजरात किंवा राजस्थानमध्ये पैसा कमवायचा होता ना. आमच्या आई-वडिलांनी या जमिनीत घाम गाळला आहे. ही मुंबई का आज बनलेली नाही. यांना काय माहितीए महाराष्ट्राचा इतिहास.' अशी जहरी टीका आव्हाडांनी यावेळी केली आहे. 

अधिक वाचा: 'कोश्यारींना कोल्हापुरी जोडे दाखवा', ठाकरेंची जहरी टीका

  • '...वेळ आली तर राजभवनात घुसावं लागेल'

'ही व्यक्ती महाराष्ट्राचा राज्यपाल राहण्याच्या लायकीचा नाही. यांना हाकलून द्या. राज्यपालांना हाकलूनच दिलं पाहिजे. यासाठी मराठी माणसाने पेटून उठलं पाहिजे. त्यांना परत बोलावा अशी आर्जवं आम्ही करणार नाही. त्यांना हाकलूनच लावलं पाहिजे. वेळ आली तर राजभवनात घुसावं लागेल. महाराष्ट्राच्या भावनांशी नका खेळू भगतसिंह...' असं भडक विधानही यावेळी जितेंद्र आव्हाडांनी केलं आहे. 

  • 'मराठी माणसामुळे टाटा-बिर्ला मोठे झाले'

'मराठी माणूस, महाराष्ट्र याबाबत कोश्यारी यांना काय माहिती आहे? आशियातील सर्वात मोठा औद्योगिक पट्टा हा ठाण्यात होता हे त्यांना माहिती आहे का त्या कोश्यारीला? जेवढ्या बोटी मुंबईतून बाहेरगावी रवाना व्हायच्या तेवढ्या बोटी पूर्ण भारतातून होत नसत. जेवढी विमानं मुंबईच्या विमानतळावर उतरायची तेवढी संपूर्ण देशभरात उतरत नसत. उगाच नाही मुंबई जगात नावाजलेली आहे. इथल्या कष्टकऱ्यांच्या जीवावर मोठे झालेले उद्योगपती म्हणजे काय इथले बाप नाहीत.' 

अधिक वाचा: गुजराती आणि राजस्थानींमुळे मुंबई आर्थिक राजधानी - कोश्यारी

'मुंबईत गिरण्या होत्या.. गिरण्यांमध्ये कोण होतं... दोन-दोन लाख गिरणी कामगार काम करत होते. टाटा-बिर्ला, रहेजा हे कोणामुळे मोठे झाले आहेत? या मराठी माणसाने घाम गाळलाय म्हणून हे मोठे झाले आहेत. या घामाचा अपमान कोश्यारींनी केला आहे.' असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या निषेध केला आहे. 

दरम्यान, आता या सगळ्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता राज्यपालांच्या या विधानाची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या दखल घेऊन त्यांच्यावर काही कारवाई करणार का? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी