Chandrakant Patil:‘मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवलं’, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने भाजपची खदखद आली समोर

ठाणे
रोहित गोळे
Updated Jul 23, 2022 | 18:23 IST

Chandrakant Patil statement exposed BJP anger: एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवल्यावर खूप दु:ख झालं, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी भाजप राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत केलं आहे.

it was feeling very sad when eknath shinde was made chief minister chandrakant patil statement exposed bjp anger
मनावर दगड ठेवून शिंदेंना मुख्यमंत्री बनवलं: चंद्रकांत पाटील  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली भाजपच्या मनातील खदखद
  • मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवलं, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य
  • एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर मोठं दु:ख झालं: चंद्रकांत पाटील

CM Eknath Shinde: पनवेल: शिवसेनेत (Shiv Sena) झालेली बंडखोरी आणि नव्याने स्थापन झालेलं सरकार या दरम्यान बरीच राजकीय उलथापालथ झाली. एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर राज्यात पुन्हा एकदा देवेंद्र  फडणवीस (Devendra Fadnavis) हेच मुख्यमंत्री (Chief Minister) म्हणून येतील अशी भाजपच्या (BJP) नेत्यांना अपेक्षा होती. पण अनपेक्षितरित्या भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदेंच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ टाकली. पण यामुळे भाजपमध्ये खदखद असल्याच आता दिसून आलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पनवेलमध्ये आयोजित भाजप राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत एक धक्कादायक असं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. (it was feeling very sad when eknath shinde was made chief minister chandrakant patil statement exposed bjp anger)

'अक्षरश: मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्यात आलं. तेव्हा प्रचंड दु:ख झालं.' असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केलं. ज्याची आता सर्व राज्यभर चर्चा सुरु आहे. तसंच या वक्तव्यानंतर भाजप आणि शिंदे गटात धुसफूस असल्याचं देखील यानिमित्ताने समोर आलं आहे.

अधिक वाचा: उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाला निवडणूक आयोगाची नोटीस

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. यानंतर सोशल मीडियावरुन चंद्रकांत पाटील यांचं हे भाषण हटवत भाजपने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. 

पाहा चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले:

'नवीन सरकार येणं ही आपल्या सगळ्यांची मानसिक गरज होती. ती व्यवहारात आल्यानंतरही असा एक नेता देण्याची आवश्यकता होती की, त्यातून योग्य मेसेज जाईल, त्यातून जे काही करतो आहोत त्याला स्थिरता येईल. त्यामुळे अक्षरश: मनावर दगड ठेवून आपण सगळ्यांनी आणि प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस यांनी आणि आपल्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय केला की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होतील.' 

'दु:ख झालं आपल्याला... परंतु ते दु:ख पचवून आपण सगळ्यांनी मिळून पुन्हा एकदा आनंदाने हा सगळा गाडा चालविण्यासाठी पुढे गेलो.' अशी खदखद चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

अधिक वाचा: CM Eknath Shinde : भाजपसोबत युती झालेली पाहून बाळासाहेबांना आनंद झाला असता – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

भाजपने चंद्रकांत पाटलांचा व्हिडिओ हटवला 

चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याची थेट दिल्लीत नोंद घेण्यात आली असल्याचं समजतं आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयानंतर प्रदेशाध्यक्षांनीच अशा प्रकारे वक्तव्य केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. याशिवाय शिंदे गट नाराज होऊ शकते. म्हणून तात्काळ चंद्रकांत पाटलांच्या या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावरुन काढून टाकण्यात आला आहे. थेट दिल्लीतून हा व्हिडिओ काढून टाकण्याचा आदेश देण्यात आल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. 

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याबाबत जेव्हा भाजप आमदार आशिष शेलार यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी देखील सारवासारव करताना असं म्हटलं की, 'चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या ज्या भावना होत्या किंवा आहेत त्या सांगितल्या.' असं आशिष शेलार यावेळी म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी