कल्याण: विधानसभा निवडणुकीला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. राज्यातील काही मतदारसंघांची यंदा खूपच चर्चा रंगली. असाच एक मतदारसंघ म्हणजे कल्याण पश्चिम. कारण भाजपने २०१४ साली जिंकलेला हा मतदारसंघ चक्क शिवसेनेसाठी सोडला. त्यामुळे भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांनी बंडखोरी करत अपक्ष उभं राहण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे शिवसेनेच्या दृष्टीने हा मतदारसंघ फार महत्त्वाचा मानला जात आहे. सुरुवातीला या मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ वरुण सरदेसाई यांना उमेदवारी देण्याची पक्ष नेतृत्वाची इच्छा असल्याची चर्चा होती. पण स्थानिक नेत्यांच्या प्रचंड दबावामुळे शिवसेनेने विश्वनाथ भोईर यांना उमेदवारी देऊ केली. सुरुवातीला अनेकांचा असा होरा होता की, अपक्ष उमेदवार नरेंद्र पवार आणि शिवसेना यांच्यात थेट लढत होईल. पण आता मनसेचे माजी आमदार आणि सध्याचे उमेदवार प्रकाश भोईर यांनीही प्रचारात आघाडी घेतली असून त्यांच्याकडे देखील तगडे उमेदवार म्हणून पाहिलं जात आहे. त्यातच स्वत: राज ठाकरे यांनी या मतदारासंघात जाऊन सभा घेतल्यामुळे आता कल्याण पश्चिमसारख्या महत्त्वाच्या मतदारसंघात नेमकं कोण बाजी मारणार? याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. याच निमित्ताने आम्ही मनसेचे उमेदवार प्रकाश भोईर यांच्या खास संवाद साधला. पाहा त्यावेळी ते नेमकं काय म्हणाले.
२०१४ विधानसभा निवडणुकीनंतर मनसेच्या अनेक नेत्यांनी राज ठाकरेंची साथ सोडून इतर पक्षांमध्ये प्रवेश केला. पण याचवेळी कल्याणचे माजी आमदार प्रकाश भोईर यांनी मात्र, राज ठाकरेंची साथ सोडली नाही. त्यामुळेच सलग तिसऱ्यांदा त्यांना मनसेकडून उमेदवारी मिळाली आहे. मनसेकडून सलग तिसऱ्यांदा उमेदवारी मिळवणं हा देखील त्यांनी एक प्रकारचा विक्रमच रचला आहे. याविषयी बोलताना स्वत: प्रकाश भोईर असं म्हणाले की, 'राज ठाकरेंसाठी सर्वस्व अपर्ण करु. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राज ठाकरेंसोबतच राहीन.'
'माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला राज ठाकरेंनी २००९ साली उमेदवारी दिली. मी आमदार झालो ती देखील राज ठाकरे यांचीच कृपा. २०१४ साली आमच्या पक्षाला लोकांनी नाकारलं. आम्ही स्वत:च्या जीवावर निवडून आलो नाही. हे सत्य आहे. त्यामुळे विजयासाठी राज साहेबच हवेत. हा फक्त जय-पराजयाचा विषय नाही. पण माजी राज ठाकरेंवर नितांत श्रद्धा आहे. यावेळी मला उमेदवारी दिली नसती तरी माझी कोणतीही तक्रार नसती. आम्हाला इथे जो उमेदवार दिला असता त्याचा प्रचार मी स्वत: केला असता. जेवढा मी आता स्वत:साठी प्रचार करतोय तेवढाच प्रचार त्या उमेदवारासाठी देखील केला असता. खरं सांगायचं झालं तर राज ठाकरेंसाठी सर्वस्व अपर्ण करेन. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राज ठाकरेंसोबत राहीन. जे सोडून गेले आहेत त्यांचे हाल काय आहेत तुम्ही पाहत आहात. जेव्हा ते नेते मनसेत होते तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला त्यांचं नाव माहित होतं. पण आज त्यांना कुणीही ओळखत नाही. त्यामुळे निष्ठा ही फार महत्त्वाची असते.' असं म्हणत प्रकाश भोईर यांनी मनसे सोडून इतर पक्षात गेलेल्या नेत्यांवरही टीका केली.
VIDEO: पाहा मनसे उमेदवार प्रकाश भोईर काय म्हणाले!
कल्याण पश्चिम मतदारसंघात मागील तीन टर्ममध्ये एकाही आमदाराला सलग दुसऱ्यांदा निवडून येता आलेलं नाही. तसं पाहिल्यास सुरुवातीपासूनच कल्याण-डोंबिवली महानगर पालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. पण गेल्या तीन टर्ममध्ये या अतिशय महत्त्वाच्या मतदारसंघात शिवसेनेला आपला आमदार निवडून आणता आलेला नाही. २००४ मध्ये हा मतदारसंघ युतीच्या वाटपामुळे भाजपकडे गेला होता. त्यावेळी भाजपचे हरिश्चंद पाटील निवडून आले होते. त्यानंत २००९ मध्ये या मतदारसंघात शिवसेना बाजी मारेल असं अनेकांचं मत होतं. पण अगदी अनपेक्षितरित्या मनसेचे प्रकाश भोईर विजयी झाले. २०१४ साली शिवसेना-भाजप यांची युती तुटली. त्यामुळे तेव्हा भाजप आणि शिवसेना यांच्यात थेट लढत झाली. तेव्हा देखील शिवसेनेच्या अनेक नेत्यांना विश्वास होता की, ही जागा शिवसेना मिळवेल. पण त्यावेळी भाजपच्या नरेंद्र पवार यांनी अगदी चुरशीच्या लढाईत बाजी मारत शिवसेनेला धक्का दिला होता. त्यामुळे गेल्या तीन टर्मचा इतिहास पाहता कल्याणकर यंदा देखील उमेदवारांना असाच अनपेक्षित धक्का देणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.