Ketaki Chitale Sent To 14 Days Judicial Custody In Sharad Pawar Facebook Post Case : ठाणे : फेसबुक पोस्टमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेली अभिनेत्री केतकी चितळे हिच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. केतकीला आज (बुधवार १८ मे २०२२) ठाणे सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. आता गोरेगाव पोलीस केतकी चितळेचा ताबा घेऊन तिची चौकशी करणार आहेत. केतकीकडून जामीन मिळविण्यासाठी न्यायालयात अर्ज केला जाणार असल्याचे वृत्त आहे.
ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट १ने केतकीची पोलीस कोठडीत चौकशी केली. चौकशीसाठी पोलिसांनी केतकीचा लॅपटॉप आणि मोबाइल जप्त केला. ठाणे पोलिसांचा सायबर विभाग सध्या केतकीच्या लॅपटॉप आणि मोबाइलची तपासणी करत आहे.
अभिनेत्री केतकी चितळे हिच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी करणारी फेसबुक पोस्ट केल्याचा आरोप आहे. केतकी चितळे प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. केतकीची पातळी सोडून केलेली टिप्पणी खपवून घेणार नाही, अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी केतकी चितळे विरोधात पोलीस तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामुळे एका पोलीस ठाण्यातील तक्रारीत न्यायालयीन कोठडी दिली जाताच दुसऱ्या पोलीस ठाण्याकडून केतकीचा ताबा घेण्याच्या हालचाली सुरू होत आहेत.