ठाणे: महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री आणि कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड त्यांच्या ताज्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. 'अल्ला को २०११ में ही पता था की २०२० में कोरोना आनेवाला है, इसिलिए कब्रस्तान बना' असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड एका सार्वजनिक कार्यक्रमात केले. 'तुम्ही म्हणता जे काही होतं ते अल्ला करतो. हे कब्रस्तानही अल्लाने तयार केले'; असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले. (maharashtra minister jitendra awhad controversial statement)
जितेंद्र आव्हाड मुंब्रा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका फरझाना शाकीर शेख यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, विरोधीपक्ष नेता शानू पठाण, परिवहन सदस्य शमीम खान यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
गृहनिर्माण मंत्री आणि कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री असलेल्या व्यक्तीने अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे वक्तव्य केल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या पुरोगामी विचारांच्या राजकीय पक्षाच्या नेत्याने सार्वजनिक सभेत केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या संदर्भात आव्हाड यांनी नंतर खुलासा करणे टाळले.
कोरोना संकट २०२० मध्ये येणार याची जाणीव असल्यामुळेच अल्लाने २०११ मध्ये कब्रस्तानसाठी भूखंड मिळेल अशी व्यवस्था केली. या भूखंडावर २०१९ पर्यंत कब्रस्तान तयार झाले. नंतर २०२० मध्ये कोरोना संकट आले. पण कब्रस्तान उपलब्ध नसते शहरात काय परिस्थिती निर्माण झाली असती याची कल्पना करणे कठीण आहे, अशा स्वरुपाचे वक्तव्य आव्हाड यांनी केले.
आव्हाड यांचे वक्तव्य म्हणजे कोरोना संकट हाताळण्यात ठाकरे सरकारला आलेले अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधकांनी केला. मंत्र्यांनी सरकार म्हणून महामारीत नागरिकांची कमीत कमी हानी होईल यासाठी काम करणे अपेक्षित आहे. पण मंत्रीमहोदयांचे वक्तव्य तशा अर्थाचे दिसत नसल्याचे विरोधक म्हणाले.
आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावरुन वाद सुरू असतानाच ठाकरे सरकारने नागरिकांना अल्टिमेटम दिले. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांत कोरोना (Coronavirus) बाधितांच्या संख्येत वाढ पहायला मिळत आहे. अमरावती जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू आहे तर वर्धा जिल्ह्यात वीकेंड लॉकडाऊन सुरू आहे. पुण्यात नाईट कर्फ्यूची घोषणा झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना अल्टिमेटम दिले. पुढील आठ दिवसांतील परिस्थिती पाहून महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर करायचा की नाही या संदर्भातला निर्णय घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी २१ फेब्रुवारी रोजी केली. कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.