Eknath Shinde : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या दोघा नेत्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

ठाणे
प्रशांत जाधव
Updated Jan 04, 2022 | 13:49 IST

Shiv sena leader tested Covid Positive । नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), खासदार अरविंद सावंत आणि युवा सेना सचिव वरूण सरदेसाई  यांना कोरोना झाला आहे.

maharashtra Urban Development Minister Eknath Shinde's corona test positive
Eknath Shinde : एकनाथ शिंदे, अरविंद सावंत यांना कोरोना  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), खासदार अरविंद सावंत आणि युवा सेना सचिव वरूण सरदेसाई  यांना कोरोना झाला आहे.
  • एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली आहे.
  •  सुप्रिया सुळे (Supriya Sule), पंकजा मुंडे (Pankaja munde),  महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur), रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही झाला कोरोना

ठाणे :  राज्यातील मंत्री आणि आमदारांच्या कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाणात दिवसेंदिवस वाढत आहे. दोन दिवसांपूर्वी १० मंत्री आणि २० आमदार कोरोना पॉझिटिव्ह होते. आता त्यात नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), खासदार अरविंद सावंत आणि युवा सेना सचिव वरूण सरदेसाई  यांना कोरोना झाला आहे.  सुप्रिया सुळे (Supriya Sule), पंकजा मुंडे (Pankaja munde),  महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur), रोहित पवार (Rohit Pawar)यांच्यासह राज्यातल्या अनेक प्रमुख नेत्यांनाही करोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे. (maharashtra Urban Development Minister Eknath Shinde's corona test positive)

यापूर्वी राधाकृष्ण विखे पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील यांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली होती. तसेच हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांना देखील कोरोना झाला असल्याचे त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कळविले होते. त्यांचे नुकतेच बाळासाहेब ठाकरेंचे नातू निहार ठाकरे यांच्याशी विवाह झाला आहे.  यापूर्वी  शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी, खासदार सुजय विखे पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली होती.

एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली आहे. तसंच आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी खबरदारी घेण्याचं आवाहनही शिंदे यांनी केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये एकनाथ शिंदे म्हणतात, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. वैद्यकीय उपचार सुरू असून माझी प्रकृती उत्तम आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी आपल्या सेवेकरीता हजर होईन.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या. - एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनाही करोनाची लागण झाल्याचं आता समोर आलं आहे. त्यांनीही ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली आहे आणि आपण विलगीकरणात असल्याचं सांगितलं आहे.

आपल्या ट्वीटमध्ये सावंत म्हणतात, माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्याने मी स्वतः विलगीकरणात जात आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी, ही नम्र विनंती. काळजी घ्या.!

तसेच युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावाचा धोका लक्षात घेता नुकतेच युवासेनेचे येत्या ८ व ९ जानेवारीला होणारे राज्यव्यापी अधिवेशन स्थगित केल्याची माहिती वरुण सरदेसाईंनी दिली होती. वरुण सरदेसाई हे कोरोना पॉझिटिव्ह आल्याने संपर्कात आलेल्या सर्वांनी चाचणी करुन घ्यावी असं आवाहन त्यांनी केले आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी