ठाणे : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ जिलेटिनने भरलेली स्कॉर्पिओ (Scorpio) आढळली होती. या गाडीचे मालक मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत आढळून आला. या प्रकरणातील मुख्य दुवा असलेल्या मनसुख यांचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मनसुख यांच्या पत्नी विमल हिरेन (Vimal Hiren) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
"आमची गाडी आठ दिवसांपूर्वी चोरी झाली होती. पोलिसांचा चौकशीसाठी कॉल येत होता आणि माझे पती पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा जात होते. पोलिसांना तपासात पूर्ण सहकार्य केलं. कालही त्यांना पोलिसांनी बोलवलं मात्र, ते परत आलेच नाही. कांदिवलीतून कुणी तावडे नावाने कॉल आला होता. ते गेल्यावर अर्धा-एक तासाने फोन बंद झाला. आम्ही सकाळपर्यंत वाट पाहिली आणि त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली. कांदिवलीतून क्राईम ब्राँन्चच्या तावडे नावाने कॉल आला होता. त्यांना भेटायला जात असल्याचं मला सांगितलं होतं" अशी माहिती विमल हिरेन यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.
विमल हिरेन यांनी म्हटलं, जेव्हा-जेव्हा पोलिसांचा फोन यायचा तेव्हा ते पोलीस स्टेशनला जात होते. आज बातमी आली की त्यांनी आत्महत्या केली. मात्र, माझे पती कधी आत्महत्या करुच शकत नाही. माझी इतकीच मागणी आहे की या प्रकरणाचे सत्य सर्वांसमोर यायला हवं. माझा कुणावरही संशय नाहीये. आमच्या संपूर्ण परिवारावर याचा परिणाम होत आहे.
मला सांगितलं की, कांदिवलीतून क्राईम ब्राँचचा फोन आला होता आणि कुणी तावडे नावाच्या व्यक्तीने भेटायला बोलवलं आहे. घोडबंदर रोडवर ते भेटण्यासाठी घरातून निघून गेले आणि त्यानंतर ते परतलेच नाहीत अशी प्रतिक्रिया विमल हिरेन यांनी दिली आहे.