MNS State Secretary Irfan Shaikh resign : कल्याण : मशिदींवर भोंगे राहणार असतील तर आम्ही लाउडस्पीकरवर हनुमान चालीसा लावू. मशिदींवरचे भोंगे काढा; अशा स्वरुपाची वक्तव्य करत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज यांच्या या भूमिकेला विरोध म्हणून मनसेतील मुस्लिम पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्यास सुरुवात केली आहे.
मनसेचे राज्य सचिव इरफान शेख यांनी राजीनामा देऊन मनसे सोडत असल्याचे जाहीर केले आहे. सचिव पदाचा तसेच पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे इरफान शेख यांनी जाहीर केले.
कल्याणमध्ये मनसे अस्तित्वासाठी धडपड करत आहे. पक्षासाठी इरफान शेख यांनी २००८ पासून धडाडीने काम केले. पण राज यांनी मशिदींच्या भोंग्याविरुद्ध भूमिका घेतल्यानंतर इरफान शेख यांनी राजीनामा दिला. स्वतःच्या समाजाविरुद्ध उभ्या असलेल्या पक्षात कसे काम करणार असा प्रश्न उपस्थित करून इरफान शेख यांनी राजीनामा दिला.
समाजात कुचंबणा आणि पक्षात अस्थिर वातावरण या परिस्थितीत कोणाकडे भावना सांगायच्या असा प्रश्न उपस्थित करत इरफान शेख यांनी राजीनामा दिला. साहेब आपण आपल्या बाजूने चुकला नसालही, पण आमच्या बाजूने अवश्य काही तरी भयंकर घडणार याचा प्रत्यय येत आहे असे कळवून इरफान शेख यांनी राजीनामा पाठवून दिला आहे.