MSRTC Strike Update Dombivli driver sells vegetables : डोंबिवली : महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांचा संप आजही सुरू आहे. अद्याप शेकडो कर्मचारी संपावर आहेत. संप करत असलेल्या कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी आहे ती तोट्यातील एसटीचे राज्य शासनाच्या सेवेत विलीनीकरण करण्याची. या मागणीवर राज्य शासनाने निर्णय घेतलेला नाही. यामुळे अद्याप संपावर असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.
डोंबिवली जवळ निळजे येथे राहणारे ३३ वर्षांचे प्रमोद चिमणे एसटीमध्ये चालक-वाहक म्हणून कार्यरत आहेत. पण संप सुरू झाल्यापासून ते कामावर गेलेले नाहीत. नोकरी सुरू नसल्यामुळे पगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. घर चालविण्यासाठी पैसे हवे म्हणून प्रमोद यांनी भाजीपाला विकण्यास सुरुवात केली आहे.
एसटीत नोकरी करताना दरमहा १२ हजार रुपये पगार त्यांच्या हाती येत होता. पण भाजी विक्रीतून जेमतेम दिवसाला २००-३०० रुपये मिळत आहेत. यातही अनिश्चितता आहे. महिन्याला आठ-नऊ हजार कमावताना दमछाक होत आहे. यामुळे घरखर्च कसा चालवावा असा मोठा आर्थिक प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.
मुंबईत विसाव्या शतकात कापड गिरण्यांचा संप सुरू झाला. हा संप कधीही मागे घेतला नाही. अनेक गिरणी मालकांनी यथावकाश आपापल्या जमिनी चढ्या दराने विकल्या. आज या जमिनींवर बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये, मॉल, मल्टिप्लेक्स, पब, बार, हॉटेल, रेस्टॉरंट सुरू आहेत. पगारवाढीची मागणी करत संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांची पुढली पिढी या नव्या उद्योगांमध्ये किरकोळ नोकऱ्या करत आहे. अनेक कामगारांची वाताहात झाली. कित्येकांनी पैशांसाठी चुकीचा मार्ग धरला आणि स्वतःचे नुकसान करुन घेतले. आता एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेतला गेला नाही तर जे कर्मचारी अद्याप संपावर आहेत त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.