शरीरावर ३० वार करत तरूणाची निर्घृण हत्या, उल्हासनगरमधील घटना

ठाणे
Updated Jan 22, 2020 | 16:52 IST | टाइम्स नाऊ मराठी

उल्हासनगरमध्ये एका तरूणाची पाच ते सात जणांच्या टोळीने हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ज्या परिसरात ही हत्या झाली तेथील सीसीटीव्हीमध्ये हा सर्व प्रकार कैद झाला आहे.

Mumbai man stabbed 30 times outside dance bar in Ulhasnagar
शरीरावर ३० वार करत तरूणाची निर्घृण हत्या, उल्हासनगरमधील घटना  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • उल्हासनगरमध्ये एका तरूणाची पाच ते सात जणांच्या टोळीने तरूणाची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
  • पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
  • या हत्येचा थरार नेहरू चौकातील सीसीटीव्हीत कैद झाला.

ठाणे: उल्हासनगरमध्ये एका तरूणाची पाच ते सात जणांच्या टोळीने तरूणाची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ज्या परिसरात ही हत्या झाली तेथील सीसीटीव्हीमध्ये हा सर्व प्रकार कैद झाला आहे. दीपक भोईर असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे. दीपक हा उल्हासनगरमधील कॅम्प तीनमध्ये माणेरे गावातील राहणारा होता. उल्हासनगर शहरातील नेहरू चौक परिसरात असलेल्या धीरू बारच्या समोरच समोवारी मध्यरात्री दीपक याची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

उल्हासनगर शहरात चोऱ्या, घरफोड्या, रस्त्यावरून चालताना होणारी लूटमार, वाहनचोरी, किरकोळ कारणांवरून हत्या अशा प्रकारच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे इथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक गुन्हेगारीचे शहर म्हणून उल्हासनगर शहराची ओळख होत आहे.

दीपकला सोमवारी रात्री एका तरूणीचा फोन आल्याने तो तिला भेटण्यासाठी उल्हासनगर येथे आला होता. तिला भेटल्यानंतर घरी निघालेला असताना बारबाहेर सापळा लावून बसलेल्या काही तरूणांनी त्याच्यावर हल्ला केला. त्यानंतर दीपक आणि त्याचा मित्र जीव वाचवण्यासाठी पळू लागले. दीपकच्या मित्राने कसाबसा तिथून पळ काढला. मात्र, दीपक पळत असताना पडला आणि त्याच्यामागून येणाऱ्या पाच ते सात जणांनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार करून त्याची हत्या केली. या हत्येचा थरार नेहरू चौकातील सीसीटीव्हीत कैद झाला.

या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी नरेश उर्फ बबल्या या गुन्हेगाराचा सहभाग असून पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गुन्हेगारांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत दीपकचा मृतदेह ताब्यात घेण्यास त्याच्या नातेवाईकांनी नकार दिला आहे.

दरम्यान, या प्रकरणी आतापर्यंत ४ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच नरेश याचा शोध सुरू आहे. या हत्येतील गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेचे पथकही तपास करत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी