Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना बेलापूर कोर्टाचं वॉरंट

ठाणे
सुनिल देसले
Updated Jan 28, 2021 | 15:35 IST

Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना बेलापूर न्यायालयाने वॉरंट बजावलं आहे. वॉरंटनुसार आता ६ फेब्रुवारी रोजी राज ठाकरेंना न्यायालयात हजर रहावे लागणार आहे. 

Raj Thackeray
राज ठाकरे (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: IANS

थोडं पण कामाचं

  • मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना बेलापूर कोर्टाचं वॉरंट
  • वाशी टोल नाक्यावरील तोडफोड प्रकरणी वॉरंट
  • ६ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

नवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांना नवी मुंबईतील (Navi Mumbai) बेलापूर न्यायालयाने (Belapur Court) वॉरंट बजावलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २०१४ साली नवी मुंबईतील वाशी टोल नाक्यावर (Vashi Toll Naka) झालेल्या तोडफोड प्रकरणी बेलापूर न्यायालयाने राज ठाकरेंना हे वॉरंट बजावलं आहे.

जानेवारी २०१४ रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात भाषण केले होते. राज ठाकरेंनी केलेल्या या भाषणानंतर मनसे कार्यकर्त्यांनी वाशी येथील टोल नाक्यावर तोडफोड केली होती. वाशी टोल नाक्यावर झालेल्या या तोडफोड प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि तोडफोड करणारे कार्यकर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलेला होता.

या तोडफोड प्रकरणात आता बेलापूर न्यायलयाने राज ठाकरेंना वॉरंट बजावले आहे. या वॉरंटनुसार, आता ६ फेब्रुवारी रोजी राज ठाकरेंना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

टोल विरोधात मनसेचे आंदोलन

महाराष्ट्रातील टोल नाक्यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन सुरू केले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात नागरिकांना टोल न भरण्याचे आवाहन सुद्धा केले होते. त्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक होऊन राज्यातील विविध भागांतील टोल नाक्यांवर तोडफोड करण्यास सुरुवात केली होती. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, औरंगाबाद, नाशिक, नागपूर येथे मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक होत टोल नाक्यांवर तोडफोड केली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी