नवी मुंबई : नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या आणि नवी मुंबईतील नोड परस्परांना अधिक सुलभरीत्या जोडले जावेत या उद्देशाने सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो (Navi Mumbai Metro) प्रकल्पांतर्गत एकूण ४ उन्नत मार्ग (एलिव्हेटेड कॉरिडॉर) विकसित करण्यात येत आहेत. त्यापैकी ११.१० कि.मी.च्या ११ स्थानकांसह तळोजा (Taloja) येथे आगार असलेल्या बेलापूर (Belapur) ते पेंधर (Pendhar) या मार्गावर मेट्रोची यशस्वी चाचणी (Metro trail run) घेण्यात आली आहे.
मात्र, सद्यस्थितीत मार्ग क्र. १वर उभारण्यात येणाऱ्या ११ स्थानकांपैकी १ ते ६ स्थानकांच्या उभारणीचे काम काही तांत्रिक कारणांमुळे तसेच कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या स्थितीमुळे अपेक्षित गतीने होत नव्हते. यामुळे सदर मार्गावरील उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करणे आणि प्रकल्पासाठी आर्थिक स्त्रोत निर्माण करणे, या निकषांचा विचार करुन सिडकोने पर्याय शोधण्यास सुरुवात केली. यानंतर सर्वात योग्य पर्याय म्हणून महा मेट्रोची निवड करण्यात येऊन या मार्गाचे काम महा मेट्रो यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महा मेट्रोने या तज्ञ गटाच्या मदतीने विविध उपक्रमांना प्रारंभ केला आहे. या तज्ञ गटाकरिता तळोजा मेट्रो आगार येथे कार्यालयासाठी जागाही सिडकोकडून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएआरएस) यांचे सुरक्षाविषयक प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर मार्ग क्रमांक १वरील स्थानक ७ ते ११ दरम्यान साधारणत: डिसेंबर २०२१ अखेरीस आणि स्थआनक १ ते ७ दरम्यान साधारणत: डिसेंबर २०२२ अखेरीस वाणिज्यिक परिचालनास (प्रवासी वाहतुकीस) सुरुवात होणार आहे. सदर मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर नवी मुंबईकरांना लवकरच पर्यावरणस्नेही आणि आरामदायक प्रवासाचा एक उत्तम पर्याय निर्माण होणार आहे.
सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो (Navi Mumbai Metro) प्रकल्पाच्या बेलापूर ते पेंधर या मार्ग क्रमांक १च्या जलद अंमलबजावणीकरिता महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनची (महा मेट्रो) नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार महा मेट्रोकडून २३ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रकल्पाच्या अंमलबजावणीकरिता २० तज्ञ अभियंत्यांच्या गटाची स्थापना करण्यात आली आहे. डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको श्री ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक महा मेट्रो श्री अश्विन मुद्गल, सहव्यवस्थापकीय संचालक सिडको यांसह सिडको आणि महा मेट्रोतील अभियंत्यांनी मेट्रो प्रकल्प स्थळाची पाहणी करुन सद्यस्थितीचा आढावा घेतला. प्रकप्ल पुरस्कर्त म्हणून सिडको कायम राहणार असून प्रकल्पासाठी अभियंता म्हणून महा मेट्रो काम पाहणार आहे.