नववधूने रिबिनीच्या सहाय्याने केली पतीची हत्या, नवी मुंबईतील घटना

ठाणे
सुनिल देसले
Updated Sep 16, 2019 | 13:17 IST

Woman kills husband in Navi Mumbai: आपल्या पतीची हत्या केल्या प्रकरणी ३३ वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. या महिलेने केसांना बांधण्याच्या रिबिनीच्या सहाय्याने आपल्या पतीची हत्या केली आहे.

Woman killed husband in Navi Mumbai
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: Getty Images

थोडं पण कामाचं

  • नवी मुंबईतील रबाळे परिसरात घडली घटना
  • आठ महिन्यांपूर्वीच झाला होता दोघांचा विवाह
  • केसाच्या रिबिनीच्या सहाय्याने पतीचा गळा आवळला
  • आरोपी पत्नीला पोलिसांनी केली अटक
  • या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरु

नवी मुंबई: पत्नीनेच पतीची हत्या केल्याची घटना नवी मुंबईतील रबाळे परिसरात घडली आहे. गुरुवारी रात्री ही घटना घडली असून या प्रकरणी आरोपी पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. पती दररोज दारू पिऊन मारहाण करत असे आणि या मारहाणीला कंटाळून ३३ वर्षीय महिलेने पतीची हत्या केल्याची माहिती समोर येत आहे.

मृतक इसमाचं नाव स्वामीनाथ दराणे असं आहे तर आरोपी महिलेचं नाव कलिंदा आहे. कलिंदा आणि स्वामीनाथ या दोघांचा अवघ्या आठ महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. विवाहानंतर हे दाम्पत्य नवी मुंबईतील रबाळे परिसरात असलेल्या एमआयडीसी भागात राहत होते. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिला कलिंदा विरुद्ध गुन्हा दाखल केला असून तिला अटक केली आहे. 

एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वामीनाथ दराणे हा दररोज दारू पिऊन घरी येत असे आणि कलिंदासोबत भांडण करुन तिला मारहाण करत असे. गुरुवारी रात्री सुद्धा असाच प्रकार घडला. स्वामीनाथ घरी दारु पिऊन आला आणि त्यानंतर कलिंदासोबत भांडण करु लागला. त्यानंतर त्याने कलिंदाला मारहाण करण्यास सुरुवात केली. दररोजच्या या त्रसाला कंटाळलेल्या कलिंदाने केसाला बांधण्याच्या रिबिनच्या सहाय्याने स्वामीनाथची गळा आवळून हत्या केली.

शुक्रवारी सकाळी स्वामीनाथची आई घरी परतली तेव्हा आपला मुलगा कुठं आहे याची विचारणा केली असता घरात झोपले असल्याचं कलिंदाने सांगितले. त्यानंतर स्वामीनाथच्या आईने घरात जाऊन पाहिले असता स्वामीनाथ हा मृतावस्थेत आढळला आणि त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. मग, स्वामीनाथच्या आईने तात्काळ पोलिसांत धाव घेतली आणि घडलेला प्रकार सांगितला. तक्रार दाखल होताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी त्यांनी मृतक स्वामीनाथच्या गळ्यावर व्रण आढळून आले. यावेळी पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याची पत्नी कलिंदाने आपला गुन्ह्याची कबुली दिली.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी कलिंदाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे. पतीच्या मारहाणीमुळेच कलिंदाने कंटाळून स्वामीनाथ याची हत्या केली की हत्येमागे आणखीन काही कारण आहे याचा पोलीस तपास करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी