ठाणे: 'बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिंघे या दोघांच्या आर्शिवादानेच महायुतीचे सरकार राज्यात स्थापन झालेले आहे. उद्धव ठाकरे यांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची जी भूमिका घेतली आहे ती भूमिका अडीच वर्षांपूर्वी घेतली असती तर आज आमच्यावर ही वेळ आली नसती.' असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.
गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री शिंदे हे ठाण्यातील आनंद आश्रम येथे आले होते. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या तसबीरीला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
पाहा एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले:
'तर आमच्यावर ही वेळ आली नसती..'
'शिवसेनेच्या सर्व खासदारांची हीच भूमिका होती की, राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणे. आम्ही देखील म्हणजे आमच्या 50 आमदारांनी आधीच त्यांना पाठिंबा दिलेला आहे. आता आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. परंतु उद्धव ठाकरे यांनी जी आता भूमिका घेतली आहे, ती भूमिका अडीच वर्षापूर्वीच घेतली असती तर आज आमच्यावर ही वेळ आली नसती.' असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला.
'सध्या राज्यात राज्यात स्थिर सरकार आहे..'
'सध्या राज्यात राज्यात जे सरकार आहे, ते स्थिर सरकार असून ते योग्य आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे पक्ष अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेसोबत युती करण्यासंदर्भातील जो प्रस्ताव दिला आहे तो योग्य नाही.' असं एकनाथ शिंदे म्हणाले.
'आम्हाला आता कोणत्याही प्रकारचे राजकारण करायचे नसून राज्याचा सर्वांगिण विकास हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.' असंही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.
'बाळासाहेब आणि आनंद दिघेंच्याच आशीर्वादाने नवं सरकार आलं'
'गुरुपौर्णिमेनिमित्त बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करुन धर्मवीर आनंद दिंघे यांना देखील वंदन केलेले आहे. या दोघांच्या आर्शिवादाने युतीचे सरकार राज्यात स्थापन झालेले आहे. या दोघांची जी शिकवण होती, ती म्हणजे सर्वसामान्यांना न्याय देण्याची होती. या राज्यातील शेतकरी, कष्टकरी, वारकरी, सर्व समाजातील घटक यांना न्याय देण्याचे काम आमचे सरकार करणार आहे. तसेच राज्याचा सर्वांगिण विकास, प्रत्येकाला न्याय देण्याचे काम करण्यासाठी सरकार कटीबध्द आहे.' असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा आपलीच शिवसेना खरी असल्याचा दावा केला आहे.
'बाळासाहेब ठाकरे यांची जी हिंदुत्वाची भूमिका होती तीच आम्ही घेतली, त्याला आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी आमच्या भूमिकेला पाठिंबा देत असल्याचेही त्यांनी सांगितले. संपूर्ण राज्यभर जी भूमिका घेतलेली आहे त्याला राज्यातून प्रतिसाद मिळत आहे. हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे, प्रत्येकाला वाटले पाहिजे हे आपले सरकार आहे.' असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
गुरुपौर्णिमेनिमित्त आनंदआश्रम येथे उल्हासनगरचे सुमारे १८ नगरसेवक, नाशिक, दिंडोरी आणि अहमदनगर येथील शिवसेना नगरसेवकांनी देखील शिंदे यांना समर्थन दिलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत.