ठाणे : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेच्या गोटात एकच खळबळ उडाली. एकनाथ शिंदे यांच्या समर्थक आमदारांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पहायला मिळत असून यामुळे महाविकास आघाडी सरकारही (Maha Vikas Aghadi) अडचणीत आलं आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांचा एक नवा व्हिडिओ समोर आला असून त्यात एका राष्ट्रीय पक्ष आपल्या पाठीशी असल्याचं ते समर्थक आमदारांना सांगताना दिसत आहे. त्यातच आता आणखी एक मोठी बातमी ठाण्यातून समोर आली आहे.
शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाल्याने शिवसेनेला एक मोठा झटका बसला आहे. त्यातच आता ठाण्याचे नरेश मस्के यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांना समर्थन जाहीर केलं आहे. इतकेच नाही तर त्यांच्यासोबत ठाण्यातील अनेक नगरसेवक असून या सर्व नगरसेवकांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होण्याची तयारी केली असल्याची माहिती समोर येत आहे. आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्यानंतर आता नगरसेवकही शिंदे गटात जाणार असल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
नरेश मस्के हे नुकतेच ठाणे महानगरपालिकेच्या महापौर पदावरुन पाय उतार झाले आहेत. ठाण्यात नरेश मस्के यांचे राजकीय वजन बऱ्यापैकी आहे. आता या नरेश मस्के यांनी शिंदेंसोबत असल्याचं जाहीरपणे सांगितलं आहे. महानगरपालिका निवडणुका तोंडावर असताना आता ठाण्यातील नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन दर्शवल्याने हा एक उद्धव ठाकरेंसाठी मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे.
एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसोबतचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकूण ४२ आमदार दिसून येत आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून एकनाथ शिंदे हे शक्तिप्रदर्शन करत असल्याचं बोललं जात आहे.
तर तिकडे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ट्विट करत एकनाथ शिंदे यांना चर्चेसाठी आवाहन केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं, "चर्चेतून मार्ग निघू शकतो.... चर्चा होऊ शकते. घरचे दरवाजे उघडे आहेत... का उगाच वण वण भटकताय? गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ! जय महाराष्ट्र!"