Raj Thackeray: वाशी टोल नाका तोडफोड प्रकरण; राज ठाकरेंना न्यायालयाकडून जामीन मंजूर

Raj Thackeray: वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना बेलापूर न्यायालयाने वॉरंट बजावले. त्यानंतर आता राज ठाकरे बेलापूर न्यायालयात हजर झाले होते.  

Raj Thackeray
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (फाईल फोटो) @mnsadhikrut  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

 • वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी राज ठाकरेंना न्यायायलाचं वॉरंट 
 • जानेवारी २०१४ मध्ये झाली होती वाशी टोलनाक्याची तोडफोड
 • शेकडो मनसैनिकांची न्यायालयाबाहेर हजेरी

नवी मुंबई : २०१४ साली नवी मुंबईतील वाशी टोलनाक्यावर (Vashi Toll Plaza) झालेल्या तोडफोड प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांना न्यायालयाने वॉरंट बजावले होते. या प्रकरणी आता राज ठाकरे बेलापूर न्यायालयात हजर झाले. न्यायालयाकडे राज ठाकरेंकडून जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आणि न्यायालयाने राज ठाकरेंना जामीन मंजूर केला आहे. जानेवारी २०१४ मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात टोलनाक्याच्या संदर्भात भाष्य केलं होतं. त्या प्रकरणात न्यायालयात आज सुनावणी झाली. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ५ मे रोजी होणार आहे आणि त्यावेळी राज ठाकरेंना न्यायालयात उपस्थित राहण्याची आवश्यकता नाहीये.

Updates: 

 1. या प्रकरणाची पुढील सुनावणी ५ मे रोजी होणार
 2. राज ठाकरेंना न्यायालयाकडून जामीन मंजूर
 3. पुढील सुनावणीत अनुपस्थित राहण्यास परवानगी देण्याचाही अर्ज
 4. राज ठाकरेंकडून जामीनासाठी अर्ज
 5. न्यायालयात सुनावणी सुरू
 6. अमित ठाकरे सुद्धा न्यायालयात दाखल
 7. राज ठाकरे न्यायालयात दाखल
 8. न्यायालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त
 9. सीवूड मनसे कार्यालयातून राज ठाकरे न्यायलयाच्या दिशेने रवाना
 10. सीवूड येथील मनसे कार्यालयात राज ठाकरे दाखल, सीवूड येथे मनसे कार्यकर्त्यांकडून राज ठाकरेंचे जंगी स्वागत
 11. मुंबईतून मनसेचे कार्यकर्ते, पदाधिकारी राज ठाकरे यांच्या ताफ्यासोबत नवी मुंबकडे निघाले
 12. राज ठाकरे यांच्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई उपस्थित
 13. राज ठाकरे आपले निवासस्थान असलेल्या कृष्णकुंज येथून नवी मुंबईकडे निघाले 

राज ठाकरेंनी केलेल्या या भाषणानंतर नवी मुंबईतील वाशी टोलनाक्यावर मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. राज ठाकरेंनी प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका ठेवत त्यांच्या विरोधात आणि तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी आता बेलापूर न्यायालयाने राज ठाकरेंना वॉरंट बजावत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. 

राज ठाकरे यांच्यासोबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई उपस्थित आहेत. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेकडो कार्यकर्ते नवी मुंबई परिसरात दाखल झाले आहेत. न्यायालयात हजेरी लावल्यानंतर राज ठाकरे हे नवी मुंबई आणि ठाण्यातील आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आगामी निवडणुकांच्या संदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मनसेची सोशल मीडियात पोस्ट

न्यायालयात सुनावणीपूर्वी जाण्याच्या एक दिवसआधी मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन एक पोस्ट करण्यात आली होती. यामध्ये म्हटलं होतं, "शेकडो गुन्हे दाखल केले गेले असले तरी ज्वलंत विचार आणि बुलंद आवाज रयतेच्या न्याय हक्कांसाठी घुमणारच...!"

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी