मनसे आमदाराचा पाठिंबा कोणाला?, पाहा काय म्हणाले राजू पाटील

ठाणे
Updated Oct 30, 2019 | 11:48 IST | टाइम्स नाऊ मराठी

MNS MLA Raju Patil: विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकमेव आमदार निवडणून आला. आता हा एकमेव आमदार नेमका कुठल्या पक्षाला पाठिंबा देणार याची चर्चा सर्वत्र रंगण्यास सुरुवात झाली आहे.

raj thackeray mns party one only mla raju patil support political party vidhan sabha election result 2019
मनसे आमदार राजू पाटील यांचा पाठिंबा कोणाला?  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

 • मनसे आमदाराचा पाठिंबा कोणाला?
 • मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका काय?
 • मनसेचा एकमेव आमदार कल्याण ग्रामीण मतदारसंघातून विजयी 
 • पाहा काय म्हणतायत मनसे आमदार राजू पाटील...

कल्याण: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत भाजपने १०५ जागांवर विजय मिळवला तर मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेने ५६ जागांवर विजय मिळवला. महायुतीला बहुमत मिळालं असलं तरी दोन्ही पक्षांत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदावरुन रस्सीखेच सुरु झाली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून अपक्ष आमदारांना आपल्या गळाला लावण्यास सुरुवात झाली आहे. असे असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील हे कोणाला पाठिंबा देणार? असा प्रश्न विचारला जात आहे.

राजू पाटील हे मनसेचे एकमेव आमदार असून ते कुठल्या पक्षाला पाठिंबा देणार याबाबत विचारले असता 'आपण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेनुसार निर्णय घेणार' असं राजू पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. विधानसभा निवडणुकीपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभेत भाषण करताना म्हटलं होतं की, "राज्यात प्रबळ विरोधी पक्ष हवा आणि त्यासाठी आपल्या उमेदवारांना मत द्या". त्यामुळे आता मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे काय निर्णय घेतात ते पहावं लागेल.

राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शंभरहून अधिक जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. मात्र, या निवडणुकीत केवळ प्रमोद (राजू) पाटील या एकमेव उमेदवाराला विजय मिळवता आला. राजू पाटील यांनी कल्याण ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढवत शिवसेनेचे उमेदवार रमेश म्हात्रे यांचा पराभव केला. मनसेच्या राजू पाटील यांचा ७१५४ मतांनी विजय मिळवला.

कल्याण ग्रामीण मतदारसंघातील निवडणूक

 1. प्रमोद (राजू) पाटील - मनसे - ९३८१८ मते
 2. रमेश म्हात्रे - शिवसेना - ८६६६८ मते

निवडणुकीनंतर पक्षीय बलाबल

 1. भाजप - १०५ 
 2. शिवसेना - ५६ 
 3. राष्ट्रवादी - ५४ 
 4. काँग्रेस - ४४ 
 5. इतर - १३ 
 6. बहुजन विकास आघाडी - ३ 
 7. एमआयएम - २ 
 8. समाजवादी पक्ष - २ 
 9. प्रहार जनशक्ती पक्ष - २ 
 10. मनसे - १ 
 11. स्वाभिमानी पक्ष - १ 
 12. सीपीआय - १ 
 13. जन सुराज्य शक्ती - १ 
 14. क्रांतिकारी शेतकरी पक्ष - १
 15. शेकाप - १ 
 16. राष्ट्रीय समाज पक्ष - १ 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...