जिवंत इतिहास असलेले गडकिल्ले सुधारा: राज ठाकरे

ठाणे
Updated Oct 12, 2019 | 22:45 IST | टाइम्स नाऊ मराठी

Raj Thackeray Rally in Kalyan: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याणमध्ये जाहीर प्रचार सभा घेतली. यावेळी राज ठाकरेंनी विविध विषयांवर भाष्य करताना सत्ताधारी शिवसेना-भाजपवर टीका केली आहे. 

Raj Thackeray rally in Kalyan
राज ठाकरे  

थोडं पण कामाचं

  • राज ठाकरेंची कल्याणमध्ये जाहीर सभा
  • प्रचारसभेत राज ठाकरेंचा शिवसेना-भाजपवर हल्लाबोल
  • कल्याण डोंबिवली मनपाला ६५०० कोटी रुपयांच्या पॅकेजचं काय झालं? 

कल्याण: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याणमधील जाहीर सभेत शिवसेना आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. शिवसेना-भाजपने केवळ आश्वासनं दिली मात्र, त्याची पूर्तता झालेलीच नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मतं मागितली जात आहेत मात्र, महाराजांच्या गड किल्ल्यांकडे दुर्लक्ष सुरु आहे असं म्हणत राज ठाकरेंनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

'जिवंत इतिहास असलेले गडकिल्ले सुधारा'

शिवसेना-भारतीय जनता पक्षाने छत्रपती शिवाजी महाराजांचं समुद्रात शिवस्मारक बनवण्याचं म्हटलं होतं. शिवछत्रपतींच्या समुद्रातील पुतळ्याबद्दल फक्त शिवस्मारक म्हणून निवडणुकांचा प्रचार सुरु आहे मात्र अजून काहीही घडलेलं नाहीये. माझं तर ठाम मत आहे की शिवाजी महाराजांच्या पुतळ्याऐवजी त्यांचा जिवंत इतिहास असलेले गडकिल्ले सुधारा, ती खरी महाराजांची स्मारकं आहेत असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

६५०० कोटी रुपयांच्या पॅकेजचं काय झालं? 

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी कल्याण डोंबिवली मनपासाठी ६५०० कोटी रुपयांचं पॅकेज देण्याचं म्हटलं होतं. त्या पॅकेजचं काय झालं? अजून काहीही नाही आणि विधानसभेत कुणी जाब विचारायलाही नाही असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? 

राज्य सरकार ३० टक्के सरकारी कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याचं बोलत आहे. नोकऱ्या जात आहेत, उद्योगधंदे बंद पडत आहेत. भाजपने २०१४च्या निवडणुकीत घोषणा दिली होती कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? आता आम्ही विचारतोय कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? असंही राज ठाकरेंनी म्हटलंय.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी