वीजबिल सवलतीच्या मुद्दयावरुन राज ठाकरेंचा शरद पवारांवर निशाणा

Raj Thackeray on electricity bills: राज्यातील नागरिकांना लॉकडाऊनकाळात आलेल्या वाढीव वीजबिलच्या मुद्द्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला आहे. 

Raj Thackeray and Sharad Pawar
राज ठाकरे आणि शरद पवार (फाईल फोटो) 

मुंबई : राज्यात लॉकडाऊन दरम्यान अनेक नागरिकांना वाढीव वीजबिल आले होते. या वीजबिलात सवलत देण्याचं आधी ऊर्जामंत्र्यांनी जाहीर केलं होतं. मात्र, नंतर हा निर्णय मागे घेण्यात आला. या विषयावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुद्धा आक्रमक पवित्रा घेत राज्यभरात आंदोलन केलं होतं. तसेच राज ठाकरेंनी राज्यपाल आणि शरद पवारांचीही भेट घेतली होती. मात्र, वीजबिल सवलतीचा कोणताही निर्णय अद्याप झालेला नाहीये. याच मुद्द्यावरुन आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. 

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

ठाण्यात एका पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी म्हटलं, "सरकारच्या मंत्र्यांनी आधी सांगितलं आम्ही वीजबिलात कपात करु आणि त्यानंतर अचानक एकदम घुमजाव झालं. ममी राज्यपालांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं शरद पवारांसोबत बोलून घ्या. मग मी शरद पवारांना भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलं की, वीज कंपन्यांच्या नावाने तुम्ही पत्र लिहा आणि ते पत्र माझ्याकडे पाठवा. मी त्यांच्यासोबत बोलतो. ५-६ दिवसांनी असं कळलं की अदानी हे पवार साहेबांच्या घरी येऊन गेले. चर्चा काय झाली माहिती नाही पण त्यानंतर सरकारकडून असं आलं की वीजबिल माफ होणार नाही."

राज ठाकरेंनी पुढे म्हटलं, "ज्यावेळी मुख्यमंत्री किंवा इतर लोकं तुमच्याकडे येतात त्यावेळी तुम्ही हे प्रश्न विचारणं गरजेचं आहे. मी आंदोलन केल्यावर तुम्ही केसेस टाकताय, तुम्ही वीजबिल माफही करत नाहीयेत आणि लोकांना भरमसाठ वीजबिल भरायला सांगत आहेत. कोणासाठी चालू आहे हे सर्व? हा निर्दयीपणा मला समजतच नाहीये. वीजबिल माफ करायचं म्हणजे या वीज कंपन्यांसोबत, सर्वांसोबत चर्चा झाल्याशिवाय होणार नाही. काहीतरी लेनदेन झाल्याशिवाय या चर्चा थांबणार नाहीत ना?"

मनसेकडून राज्यभरात करण्यात आले होते आंदोलन

राज्यातील नागरिकांना आलेले वाढीव वीजबिल कमी करण्यात यावं अशी मागणी मनसेने केली होती. मनसे नेत्यांनी नोव्हेंबर महिन्यात पत्रकार परिषद घेत म्हटलं होतं की, वाढीव वीज बिलाबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी निर्णय घेतला की आम्ही कोणत्याही प्रकारे वीज बिलात सवलत देऊ शकत नाही. ही महाराष्ट्राच्या साडे अकरा कोटी जनतेची फसवणूक आहे, विश्वास घात आहे. तुमच्या श्रेयवादाच्या लढाईमुळे महाराष्ट्राच्या जनतेने का भोगायचं? मनसेतर्फे आम्ही सरकारला अल्टिमेटम देतो की, सरकारकडून वीज बिलात सलवत दिली नाही तर जिल्ह्याजिल्ह्यात आंदोलन करण्यात येईल. मनसेने दिलेल्या या अल्टिमेटम नंतरही राज्य सरकारकडून वीजबिलात सवलत न दिल्याने मनसेकडून राज्यभरात आंदोलनही करण्यात आले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी