Rajyasabha elections in Maharashtra, Shivsena has not withdrawn its candidate, so elections will be held says Devendra Fadnavis : पनवेल : शिवसेना म्हणते की राज्यसभा निवडणूक झाल्यास घोडेबाजार होणार. पण ही निवडणूक टाळणे शिवसेनेच्या हाती होते. त्यांनी त्यांचा उमेदवार मागे घेतला असता तर निवडणूक झाली नसती, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. आम्ही निवडणूक लढणार आहोत. आमच्याकडे शिवसेनेपेक्षा जास्त मते आहेत. अशा परिस्थिती उमेदवारी त्यांनी मागे घेणे अपेक्षित होते. शिवसेनेला घोडेबाजाराची चिंता वाटत आहे. पण आम्हाला आमदारांच्या सदसदविवेकबुद्धीवर विश्वास आहे; असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
याआधी महाराष्ट्रात राज्यसभेसाठी खासदारांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता मावळली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ३ जून रोजी दुपारी ३ वाजता संपली. पण अर्ज भरणाऱ्यांपैकी कोणीही माघार घेतलेली नाही. यामुळे आता सहा जागांसाठी निवडणूक रिंगणात सात उमेदवार आहेत. भाजपकडून ३, शिवसेनेकडून २ तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाकडून प्रत्येकी एक उमेदवार निवडणूक रिंगणात आहे.
अर्ज मागे घेण्याची मुदत संपण्याच्या काही तास आधी महाविकास आघाडीच्यावतीने राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आणि जयंत पाटील तसेच शिवसेनेचे अनिल देसाई यांनी भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीस यांच्या मुंबईतील सागर बंगल्यावर ही भेट झाली. या प्रसंगी भाजपकडून फडणवीस आणि पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते. दोन्ही बाजूच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली. पण तोडगा निघाला नाही. भाजप आणि शिवसेना या दोन्ही गटांनी माघार घेणार नाही असे स्पष्ट केल्यामुळे चर्चा अपयशी ठरली.
भाजपकडून पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक हे तीन उमेदवार राज्यसभेची निवडणूक लढवत आहेत. शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार निवडणूक रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल तर काँग्रेसकडून इमरान प्रतापगढी निवडणूक लढवत आहेत. मतदान शुक्रवार १० फेब्रुवारी २०२२ रोजी होणार आहे.