NCP Vs Shiv Sena । ठाण्यात शिवसेना-राष्ट्रवादीत शाब्दिक चकमकी, राष्ट्रवादीच्या नेत्याचे शिवसेनेला खुले आव्हान 

 राष्ट्रवादीचे पदाधिकारी आमच्यावर चिखलफेक करतात म्हणून आगामी पालिका निवडणूकीत त्यांच्याशी आघाडी करू नये अशी भूमिका शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे.

Shiv Sena-NCP verbal clash in Thane, NCP leader Najib mulla open challenge to Shiv Sena
ठाण्यात शिवसेना-राष्ट्रवादीत शाब्दिक चकमकी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  •  राष्ट्रवादीचे पदाधिकारी आमच्यावर चिखलफेक करतात म्हणून आगामी पालिका निवडणूकीत त्यांच्याशी आघाडी करू नये अशी भूमिका शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे.
  • आरोप प्रत्यारोपांची चिखलफेक एकतर्फी नाही.
  • शिवसेनेने येत्या निवडणुकीत स्वबळावर सत्ता स्थापन करून दाखवावी, अशी आक्रमक भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते नजीब मुल्ला यांनी घेतली आहे.

ठाणे :   राष्ट्रवादीचे पदाधिकारी आमच्यावर चिखलफेक करतात म्हणून आगामी पालिका निवडणूकीत त्यांच्याशी आघाडी करू नये अशी भूमिका शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे. परंतु, आरोप प्रत्यारोपांची चिखलफेक एकतर्फी नाही. शिवसेनेचे पदाधिकारीसुद्धा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पक्षाचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर सातत्याने टीका करत आहेत. त्यामुळे महाआघाडीचा धर्म पाळण्याची जबाबदारी फक्त राष्ट्रवादी काँग्रेसची नाही. शिवसेनेला आघाडी करण्यात स्वारस्य नसेल तर आम्ही देखील स्वबळावर निवडणूक लढण्यास तयार आहोत. हिम्मत असेल तर शिवसेनेने येत्या निवडणुकीत स्वबळावर सत्ता स्थापन करून दाखवावी, अशी आक्रमक भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते नजीब मुल्ला यांनी घेतली आहे.

Also Read :  NCP Anand Paranjape criticise Shivsena : ठाणे मनपा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी-शिवसेना वाद 


खारेगाव येथील रेल्वे उड्डाण पुलाचे काम मार्गी लावण्यासाठी कुणी पाठपुरावा केला आणि त्याचे श्रेय कुणाला या मुद्यावरून गेल्या चार दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाकयुद्ध पेटलेले आहे. लोकार्पणाचा सोहळा संपल्यानंतर या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपली भूमिका प्रसिद्धी माध्यमांकडे मांडली. मात्र, त्यानंतर लगेचच शिवसेनेने पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली.  

त्याला प्रत्युत्तर म्हणून आनंद परांजपे यांनी भूमिका मांडली. त्यानंतर महापौर आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन टीका टिपण्णी केली. शिवसेनेला आगामी निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करण्याची इच्छा नसून आम्ही स्वबळावर सत्ता स्थापन करून अशी भूमिकाही महापौर नरेश म्हस्के आणि राम रेपाळे आदींनी मांडली आहे. सोमवारी राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला यांनी त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

गेल्या १२ वर्षांत जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या अथक प्रयत्नांमुळेच कळवा मुंब्र्यात विकासाची गंगा अवतरली आहे. वर्षानुवर्षे रखडलेली असंख्य विकास कामे आव्हाड यांनी मार्गी लावली आहेत. त्यामुळेच या मतदार संघात ते विक्रमी मताधिक्क्याने निवडून येतात. त्यांना कोणत्याही कामांचे श्रेय लाटण्याची गरज नाही. ये पब्लिक है सब जानती है … असे सांगत नजीब मुल्ला यांनी आव्हाड यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. 

तसेच, राष्ट्रवादी आमच्यावर चिखलफेक करत असल्याने त्यांच्याशी आघाडी नको असे सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. परंतु, आम्ही टीका केली तर ती चिखलफेक असेल तर त्यांची टीका स्तुस्तीसुमने ठरत नाहीत. शिवसेनेही आमच्या नेत्यांवर आरोप करून बदनामी करत आहे. त्यामुळे शिवसेनेची भूमिकाच दुटप्पी आहे. आघाडी धर्माचे पालन हे दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून अपेक्षित आहे. त्यांना आगामी निवडणूकीत आघाडी करण्याची इच्छा नसेल तर आम्हीही स्वबळावर लढण्यास तयार आहोत. शिवसेनेच्या मागे आमचा पक्ष फरफटत जाणार नाही हे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ध्यानात ठेवावे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचा जनाधार सतत वाढत आहे. त्यामुळे पुन्हा आपलीच सत्ता येईल या भ्रमात कुणी राहू नये असा इशाराही मुल्ला यांनी दिली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी